स्पर्धेच्या या टप्प्यात किंग्स इलेव्हन पंजाबकडे गेल्या वर्षीचा कडवा अनुभव विसरण्याची संधी आहे. त्यांनी यंदाच्या मोसमात केलेली सुरुवात बघता त्यांच्याकडे प्लेआॅफसाठी पात्रता मिळविण्याची चांगली संधी आहे. सीएसकेविरुद्ध निराशाजनक कामगिरीनंतर त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या चुका सुधारल्या. गोलंदाजांनी केलेली शानदार कामगिरी महत्त्वाची बाब ठरली.
पंजाब संघ कागदावर मजबूत भासत नाही. त्यामुळे या स्थितीत संघाच्या कामगिरीचे श्रेय कर्णधाराला द्यायला हवे. अश्विन गोलंदाजीही चांगली करीत आहे. त्याचीही त्याला मदत मिळत आहे. त्याचसोबत त्याच्याकडे वर्षभराचा अनुभव आहे. त्यामुळे संघासाठी काय योग्य आहे, याची त्याला कल्पना आली आहे. त्यामुळेच सध्या सर्वांची नजर पंजाब संघाच्या कामगिरीवर केंद्रित झाली आहे.
पंजाबचा प्रतिस्पर्धी संघ मुंबईवरही सर्वांची नजर असेल. कारण या संघात अनेक शानदार खेळाडू आहेत. मुंबई संघ फलंदाजी क्रमामध्ये काही बदल करतो का, याबाबत उत्सुकता आहे. किएरॉन पोलार्डला सूर गवसण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे तो धोकादायक ठरू शकतो. जर त्याला फलंदाजीची संधी मिळाली तर तो संघासाठी काही सामने जिंकू शकतो. मला नेहमी वाटते की, फिनिशरच्या बिरुदामुळे पोलार्डला आपल्या फलंदाजीतील कौशल्य दाखविण्यापासून रोखले असावे. वानखेडेसारख्या खेळपट्टीवर चौथ्या क्रमांकाची भूमिका महत्त्वाचीअसते.माझ्या मते, हार्दिक पांड्यालाही फलंदाजीसाठी अधिक वेळ मिळायला हवा. तो डावाच्या शेवटी आक्रमक खेळण्यापेक्षा अधिक उपयुक्त फलंदाज आहे. तो आक्रमक खेळाडू आहे. टी२० मध्ये तो केवळ फलंदाज म्हणून खेळण्याचा पूर्ण हकदार आहे. तो पुन्हा पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसेल, अशी आशा आहे.दवाचा लढतीवर प्रभाव पडणार नाही, अशी मला आशा आहे. त्यामुळे बॅट व चेंडूमधील लढाई काहीअंशी संपुष्टात येते. सामन्यापूर्वीच्या सर्व योजना व रणनीती निरर्थक ठरतात. जसे पंजाब-हैदराबाद लढतीत घडले. आयपीएलसारख्या पातळीच्या स्पर्धेत निकालाचे भाकीत वर्तविणे कठीण ठरते. कुणी शास्त्रज्ञ यावर काही समाधान शोधू शकतो का?