India vs England 2nd T20I Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ४९ धावांनी विजय मिळवताना मासितेच २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२१ धावांत तंबूत परतला. रवींद्र जडेजा व रोहित शर्मा यांच्या फटकेबाजीनंतर भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल यांनी गोलंदाजीत कमाल दाखवली. २०१४नंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका हरलेला नाही. २०१६ ( घरच्या मैदानावर) व २०१८ ( परदेशात) मध्ये भारताने २-१ अशा फरकाने, तर २०२१मध्ये ( घरच्या मैदानावर) ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.
प्रथम फलंदाजी करताना रोहित ( ३१) व रिषभ पंत ( २६) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, विराट कोहली ( १), सूर्यकुमार यादव ( १५), हार्दिक पांड्या ( १२) या मधल्या फळीने अपयशाचा कित्ता गिरवला. रवींद्र जडेजाने २९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ४६ धावा करताना भारताला ८ बाद १७० धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने ४ व पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, इंग्लंडकडून मोईन अली ( ३५) व डेव्हिड विली ( ३३*) यांनीच संघर्ष केला. भुवीने ३, तर बुमराह व चहल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
दरम्यान, या सामन्यानंतर सोशल मीडियावर भारतीय खेळाडूने अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांच्या मते रोहित शर्माचा तो आवाज आहे आणि त्याने हार्दिक पांड्याला शिविगाळ केल्याचे म्हटले जात आहे. पण, तेच दुसरीकडे हार्दिकने रोहितला शिविगाळ केल्याचीही चर्चा आहे. सोशल मीडियावर सध्या #HardikAbusedRohit हा ट्रेंड सुरू आहे. व्हिडीओत अपशब्द वापरल्याचे स्पष्ट ऐकू येते आहे. पण, तसे अपशब्द आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी वापरायला नको, ही चाहत्यांची भूमिका आहे.