हार्दिकचा ‘फायनल’चा निर्धार, सांभाळणार सामन्यातील फलंदाजीची मदार

क्वालिफायर-१; राजस्थान रॉयल्सकडून मिळणार कडवी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 05:30 AM2022-05-24T05:30:15+5:302022-05-24T05:30:42+5:30

whatsapp join usJoin us
Hardik's decision on the 'final' will be handled by the batting side of the match | हार्दिकचा ‘फायनल’चा निर्धार, सांभाळणार सामन्यातील फलंदाजीची मदार

हार्दिकचा ‘फायनल’चा निर्धार, सांभाळणार सामन्यातील फलंदाजीची मदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये शानदार कामगिरी करताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविले. यंदाच्या सत्रात प्ले ऑफ प्रवेश करणारा पहिला संघ ठरलेल्या गुजरातला मंगळवारी पहिल्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. साखळी फेरीत गुजरात आणि राजस्थान संघ एकदा आमने-सामने आले होते. यामध्ये हार्दिकने शानदार खेळ करताना आपल्या संघाला विजयी केले होते. त्यामुळे क्वालिफायर लढतीत गुजरातचे पारडे राजस्थानच्या तुलनेत वरचढ असेल. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या पाच लढतींमध्ये केवळ दोन सामने जिंकण्यात यश मिळविले.

फलंदाजीमध्ये गुजरातची मदार शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक यांच्यावर अधिक असेल. दोघांनी ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच अनुभवी वृद्धिमान साहानेही नऊ सामन्यांतून तीन अर्धशतक झळकावत आपली क्षमता दाखवून दिली. डेव्हिड मिलरनेही काही सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी करीत संघाच्या विजयात हातभार लावला असूनल राहुल तेवतिया आणि राशिद खान यांनी डेथ ओव्हर्समधील फटकेबाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. गोलंदाजीमध्ये राशिद खान गुजरातचा हुकमी एक्का असून, मोहम्मद शमी आणि हार्दिक यांनीही चांगली कामगिरी केली आहे. राशिद आणि हार्दिक यांचा अष्टपैलू खेळ गुजरातसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

दुसरीकडे, जोस बटलरच्या कामगिरीवर राजस्थानची मोठी मदार आहे. त्याने यंदा तीन शतके आणि तीन अर्धशतकांसह सर्वाधिक ६२९ धावा केल्या असल्या तरी, गेल्या तीन सामन्यात त्याला अपेक्षित धावा काढता आल्या नाहीत. कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल यांनीही ३०० हून अधिक धावा केल्या आहेत. 

राजस्थानने नऊ साखळी सामने जिंकताना दुसरे स्थान पटकावत पहिल्या क्वालिफायर लढतीसाठी पात्रता मिळविली. कर्णधार म्हणून हार्दिकने यंदा सर्वांनाच प्रभावित केले. त्याच्या नेतृत्वामध्ये गुजरातने १४ साखळी सामन्यांपैकी १० सामने जिंकताना सर्वाधिक २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले.
 

Web Title: Hardik's decision on the 'final' will be handled by the batting side of the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.