नवी दिल्ली : 23 ऑक्टोबर 2022 रोजी ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून शानदार विजय मिळवून स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नवरील प्रतिष्ठित लढतीत किंग कोहलीने 53 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली होती. विराटच्या या अविस्मरणीय खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतीय संघासमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र किंग कोहलीने त्याची सर्वोत्कृष्ट ट्वेंटी-20 खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
दरम्यान, 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे 4 गडी स्वस्तात माघारी परतले होते. त्यांनतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला आणि अखेरच्या षटकांपर्यंत नेला. या सामन्यातील विराट कोहलीच्या 2 षटकारांची नेहमीच चर्चा केली जाते, जे त्याने 19व्या षटकातील अखेरच्या 2 चेंडूवर हॅसिर रौफला मारले होते. खरं तर तेव्हा भारतीय संघाला 8 चेंडूत 28 धावांची आवश्यकता होती, परंतु कोहलीने सलग दोन षटकार ठोकून विजय भारताकडे खेचून आणला. आता कोहलीने मारलेल्या या षटकारांना खुद्द हॅरिस रौफने देखील सलाम ठोकला आहे.
ते षटकार फक्त विराटच मारू शकतो - रौफ पाकिस्तानी संघ सध्या इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशातच हॅरिस रौफने एका मुलाखतीत म्हटले, "विराट कोहली ज्या प्रकारे विश्वचषकात खेळला, तो त्याचा क्लास आहे, तो कोणत्या प्रकारचे शॉर्ट्स खेळतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. तसेच त्याने ज्या प्रकारे ते षटकार मारले, मला वाटत नाही की माझ्या गोलंदाजीवर इतर कोणताही खेळाडू असा शॉट मारू शकेल."
विराट कोहलीवर केला कौतुकाचा वर्षाव "जर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने हे षटकार मारले असते तर मला नक्कीच वाईट वाटले असते पण ते कोहलीच्या बॅटमधून आले आणि तो पूर्णपणे वेगळा खेळाडू आहे", अशा हॅरिस रौफने किंग कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. रौफने आणखी सांगितले की, भारताला शेवटच्या 12 चेंडूत 31 धावा हव्या होत्या. मी चार चेंडूत फक्त तीन धावा दिल्या होत्या. मला माहित होते की नवाज शेवटचे षटक टाकणार आहे, तो एक फिरकी गोलंदाज आहे आणि मी त्याच्यासाठी 20 पेक्षा जास्त धावा सोडण्याचा प्रयत्न केला होता. विराट कोहली असा शॉर्ट खेळेल याची कल्पना देखील केली नव्हती असे हॅरिस रौफने आणखी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"