भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधना ( Smriti Mandhana) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur ) यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात शतकी खेळी केली. स्मृतीने सलग दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावताना सचिन तेंडुलकर, डेव्हिड वॉर्नर व रोहित शर्मा यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. हरमनप्रीत कौरनेही पराक्रम गाजवला.
स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी; सचिन, रोहितच्या विक्रमाशी बरोबरी; मिताली राजला टाकले माघारी
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शफाली वर्मा २० धावा करून माघारी परतल्यानंतर आलेली दयालन हेमलथा ( २४) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. मात्र, स्मृती व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार देताना तिसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली. स्मृतीने मालिकेतील दुसरे शतक पूर्ण करून संघाला ४५.५ षटकांत ३ बाद २७१ धावांपर्यंत पोहोचवले आहे. स्मृतीने १२० चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १३६ धावा केल्या. स्मृती व हरमनप्रीत यांनी १३६ चेंडूंत १७१ धावा ( ७.५४ सरासरी) जोडल्या आणि भारतीय महिलांनी नोंदवलेली ही १५० हून अधिक धावांची वेगवान भागीदारी ठरली. यापूर्वी २०१७ मध्ये पुनम राऊत व दीप्ती शर्मा यांनी आयर्लंडविरुद्ध ७.०३च्या सरासरीने २७३ चेंडूंत ३२० धावांची भागीदारी केली होती. हरमनप्रीत कौरने शतकी खेळी करून पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला कर्णधार ठरली. तिने ८८ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या आणि रिचा घोषने १३ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. भारतीय महिलांनी आज ३ बाद ३२५ धावा केल्या आणि वन डे क्रिकटेमधील भारताची ही तिसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१७ मध्ये आयर्लंडविरुद्ध २ बाद ३५८ आणि २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ५ बाद ३३३ धावा केल्या होत्या. पण, भारतीय महिलांनी घरच्या मैदानावर प्रथमच तीनशेपार धावा केल्या. यापूर्वी २००४ मध्ये धनबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध २ बाद २९८ धावा, ही भारतीय महिला संघाची सर्वोच्च धावसंख्या होती.