बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धांची चर्चा रंगली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र रविवारी झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवून उपांत्य फेरीची आशा कायम ठेवली आहे. भारतीय संघाने ८ बळी राखून मिळवलेल्या मोठ्या विजयासह संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय पुरूष संघातील दिग्गजांना जे जमले नाही ते कौरने आपल्या नेतृत्वात करून दाखवले आहे.
तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना अपयश आले. भारताकडून स्नेह राना आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले आहेत. तर मेघना सिंग, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी पटकावण्यात यश आले आहे.
स्मृती मानधनाची आक्रमक खेळीभारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आक्रमक अर्धशतक झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. पावसाच्या विलंबामुळे १८ षटकांचा सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून स्मृती मानधनाने (६३) नाबाद खेळी केली.
हरमनप्रीतने मोडला धोनीचा विक्रमआंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा ४२ वा विजय मिळवला. यासोबतच भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारी ती पहिली कर्णधार ठरली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी आहे, त्याच्या नेतृत्वात संघाने ७१ सामन्यांमधील ४१ सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ३० विजयांसह विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर २७ विजयासह रोहित शर्माच्या नावाची नोंद आहे. भारतीय महिला संघाला बारबोडासविरूद्ध आपला शेवटचा सामना खेळायचा आहे, ज्यामधील विजयी संघ थेट पात्रता फेरी गाठेल.
भारतीय गोलंदाजांचा बोलबालारविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पहिल्या ११.३ षटकांमध्ये ४ बाद केवळ ६४ धावा करता आल्या होत्या त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवून पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ १९ चेंडूत १७ धावांवर असताना स्नेह राणाने तिला बाद केले. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण स्नेह राणाने पाकिस्तानच्या आशेवर पाणी टाकले. इरम जावेद आणि डायना बेग या पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही.