harmanpreet kaur latest news : भारतीय महिला क्रिकेट संघाला अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव करून प्रथमच आशिया चषक जिंकला अन् हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील संघाचा विजयरथ थांबला. आपल्या तापट स्वभावासाठी ओळखली जाणारी हरमन नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. तिने पोलिसांत नोकरी करावी अशी तिच्या आज्जीची इच्छा होती, असे ती सांगते. हरमनचे वडील आणि आई तिच्या आयुष्यातील मोठे गुरू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारण्यात तिला पालकांनी खूप सहकार्य केले. याबद्दल हरमनप्रीत अनेकदा सांगत असते. आता तिने एका मुलाखतीत बोलताना विविध बाबींवर प्रकाश टाकला.
हरमनप्रीत सांगते की, या जगातील प्रत्येकात एक वेगळी कला आहे. आपण स्वत:वर किती विश्वास ठेवतो हे महत्त्वाचे असते. त्यामुळे इथे सगळेजण योद्धाच आहेत... पण, मला कोणा एकाचे नाव घ्यायचे झाले तर मी योद्धा म्हणून युवराज सिंगकडे पाहते. ज्या परिस्थितीत त्याने देशासाठी मैदान गाजवले ते प्रेरणादायी आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, त्यातील मी किमान दहा टक्के जरी आत्मसात केले तरी खूप मोठी गोष्ट असेल. दिवसेंदिवस महिला क्रिकेटची क्रेझ वाढत चालली आहे. पुरूष क्रिकेटपटू आमचा खेळ पाहत असतील का याबद्दल मला शंका वाटायची. मात्र, एकदा सुरेश रैनाने मला माझ्या शतकी खेळीबद्दल सांगितले. तो प्रत्येक शॉट्सबद्दल बोलत होता. तेव्हा मला खात्री पटली की, सर्वजण आमचा खेळ पाहत असतात. त्यामुळे खूप आनंद वाटला. हरमनप्रीतची 'मन की बात'तसेच माझ्या घरातील अनेकांना क्रिकेटबद्दल फारसे माहिती नव्हते. मात्र, मी क्रिकेटमध्ये येताच ते आता मला आवर्जुन सल्ले देत असतात. माझी अनेकदा चिडचिड होते. मला का माहिती नाही पण लगेच राग येतो. लहानपणी मुलांसोबत खेळल्यामुळे तोंडून नकळत शिवी निघते. यावरून अनेकदा वरिष्ठांनी मला फटकारले देखील आहे. मी हळूहळू यात सुधारणा करत आहे. भारताच्या विद्यमान संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. पण, मला वाटते की, रिचा घोष माझ्यापेक्षाही पुढे जाईल. कारण तिच्यात ती क्षमता आहे, असेही हरमनप्रीतने सांगितले.
भारतीय कर्णधार अविवाहित आहे. तिने लग्नाबद्दल सांगितले की, आमचे व्यग्र वेळापत्रक असते... सततच्या क्रिकेटमुळे कुटुंबाला देखील फारसा वेळ देता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीशी जमवून घेणारा जोडीदार असायला हवा. हे सर्वकाही समजून घेणारा साथीदार असावा, अशी महिला क्रिकेटपटूंची मानसिकता आहे.