Harmanpreet Kaur, Women's IPL 2022: महिलांच्या IPL स्पर्धेत यंदाच्या हंगामात पहिला सामना जिंकल्यानंतर सुपरनोवाज संघाने दुसऱ्या सामन्यातही दमदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी मिळालेल्या सुपरनोवाज कडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने धडाकेबाज ७१ धावांची खेळी केली. तिला विकेटकिपर फलंदाज तानिया भाटिया हिची चांगली साथ लाभल्याने संघाने २० षटकात १५० धावांपर्यंत मजल मारली. हरमनप्रीत कौरने चौकार षटकारांची आतषबाजी करत मोठी खेळी केली.
हरमनप्रीतच्या सुपरनोवाज संघाची सुरूवात खराब झाली होती. प्रिया पुनिया, हरलीन देओल आणि डिअंड्रा डॉटिन हे तीन गडी १८ धावांतच बाद झाले. पण नंतर कौर आणि तानिया दोघींनी दमदार कामगिरी केली. अर्धशतक होईपर्यंत थोडी संथ खेळणारी हरमनप्रीत कौर नंतर फटकेबाजी करताना दिसली. तिने ७ चौकार आणि ३ षटकार खेचत अवघ्या १० धावांत ४६ धावा कुटल्या. पण ५१ चेंडूत ७१ धावा केल्यावर ती बाद झाली. तिने जागेवर बसून मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला. पाहा तो षटकार मारलेला व्हिडीओ-
---
दरम्यान, सुपरनोवाज संघाने पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझर्स संघाला पराभवाची धूळ चारली. त्यांनी पहिला सामना ४९ धावांनी जिंकला. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास सुपरनोवाजला थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. पण आजचा सामना गमावल्यास त्यांना तिसऱ्या सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.