आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघाला गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन महिला संघाने ९ धावांनी पराभूत केले. या पराभवामुळे भारतीय महिला संघाला उंपात्य फेरीत प्रवेश करण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. जर पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला फार कमी अंतराने पराभूत केले तर टीम इंडियाचा स्पर्धेतील प्रवास कायम राहू शकतो. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ जिंकला तर भारतीय संघाला गाशा गुंडाळून मायदेशी परतावे लागेल. महत्त्वाच्या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत कौर शेवटपर्यंत मैदानात थांबली. पण शेवटी तिनं केलेली एक चूक चांगलीच महागात पडली.
पहिल्या ३ विकेट्सच्या रुपात शेफाली, स्मृती अन् जेमिमाचा फ्लॉप शो
शारजाहच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतासमोर १५२ धावांचे टार्गेट सेट केले होते ऑस्ट्रेलियन महिला संघाने ठेवलेल्या आव्हान पार करताना भारतीय संघाच्या डावाची सुरुवातच खराब झाली. शेफाली वर्मा २०(२०) आणि स्मृती मानधना ६(१२) या दोघी स्वस्तात माघारी फिरल्या. जेमिमा रॉड्रिग्सजही १२ चेंडूत संघाच्या धावसंख्येत १६ धावांची भर घालून माघारी परतली होती. ४७ धावांवर भारतीय महिला संघाने पहिल्या ३ विकेट्स गमावल्या होत्या.
हरमनप्रीत कौरनं दीप्तीच्या साथीनं दिला डावाला आकार
भारताची स्टार बॅटर आणि कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने दीप्ती शर्माच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. दीप्ती माघारी फिरल्यावर हरमनप्रीत शेवटपर्यंत मैदानात थांबली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. यात तिची एक चूक चांगलीच महागात पडलीय
हरमनप्रीतनं संघाला विजयाच्या अगदी जवळ नेलं
भारतीय महिला संघाने डावातील १७ षटकानंतर धावफलकावर ५ विकेट्सच्या मोबदल्यात ११२ धावा केल्या होत्या, अखेरच्या ३ षटकात ४० धावांची आवश्यकता होती. हरमनप्रीत आणि पूजा वस्त्राकर यांनी १८ व्या आणि १९ व्या षटकात अनुक्रमे १२ आणि १४ धावा काढत संघाला विजयाच्या जवळ आणले होते. अखेरच्या षटकात भारतीय संघाला १४ धावांची गरज होती.
पण शेवटी तिच्याकडून जे अपेक्षित होत त्यासाठी तिनं साधा प्रयत्नही नाही केला
स्ट्राइकवर असणाऱ्या हरमनप्रीत कौरनं पहिल्या चेंडूवर एक धाव काढली. जे तिच्याकडून अपेक्षित नव्हते. पूजा वस्त्राकर हिने आधीच्या षटकात चौकार जरूर मारला होता. पण अखेरच्या षटकात हरमनप्रीतनं आपल्यावरील जबाबदारी कुठं तरी झटकल्याचा सीन दिसून आला. मग जे व्हायला नको होते तेच झाले. पूजानं आपली विकेट गमावली. त्यानंतर मैदानात उतरलेली अरुंधती रेड्डी एक चोरटी धाव घेण्याच्या नादात रन आउट झाली. यातही एक चांगली गोष्ट ही घडली की, हरमनप्रीत कौर पुन्हा स्ट्राइकवर आली. ३ चेंडूत १३ धावा फक्त तिच करू शकली असती. पण यावेळीही चौथ्या चेंडूवर तिने एकेरी धाव घेत श्रेयंका पाटील हिला स्ट्राइक दिले. हमनप्रीत मोठा फटका मारताना आउट झाली असती तरी काही वाटले नसते. पण शेवटपर्यंत लढून ही रिस्क न घेण्याचा जो डाव खेळला तो तिची मोठी चूक दाखवून देणारा होता.