भारतीयांसाठी जणू काही धर्म असलेल्या क्रिकेटने तमाम भारतीयांना आपलेसे करण्यात काहीच कसर सोडली नाही. आशियाई देशांमध्ये किंबहुना जगात सर्वाधिक क्रिकेटचे चाहते असलेल्या भारतात या खेळाने क्रिकेटपटूंना हिरो बनवून टाकले. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मासह कित्येकांना क्रिकेटने प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. क्रिकेटच्या या भलत्याच लोकप्रियतेमुळे भारतात इतर खेळांकडे दुर्लक्ष होते हे सत्य नाकारुन चालणार नाहीच... पुरुषांप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे. आता पुरुषांप्रमाणे महिलांच्या क्रिकेटला देखील तितकीच लोकप्रियता मिळत असल्याचे दिसते. आशिया चषक, राष्ट्रकुल स्पर्धा आणि विश्वचषक त्यात महिला प्रीमिअर लीगची पडलेली भर. यामुळे महिला क्रिकेटपटूंना एक नवीन व्यासपीठ मिळाले. पुरुष असो की महिला ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच इतर संघांना वरचढ ठरत आला आहे.
अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने कांगांरुंचा बदला घेत त्यांची पळता भुई थोडी केली. पण, भारताच्या महिला संघाला मात्र पुरुष संघाप्रमाणे कामगिरी करण्यात अद्याप तरी अपयश आले. सध्या यूएईच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. नेहमीप्रमाणे टीम इंडियाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार बनवून माध्यमांनी किंबहुना अतिउत्साही चाहत्यांनी प्रोत्साहन दिले. संघाची तयारी आणि कर्णधारासह प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या मेहनतीला दिलेली दाद यामुळे भारतीय शिलेदारांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला. पण, भारत यंदा असुरक्षित मतदारसंघात आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. कारण नेहमीच भारतासमोर 'काळ' बनून उभा राहणारा ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या गटात आहे. त्यामुळे चाहत्यांना जी भीती होती तसेच रविवारी घडले अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवाची मालिका कायम राहिली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारताला आपल्या सलामीच्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि श्रीलंकेला नमवून हरमनसेनेने उभारी घेतली पण ऑस्ट्रेलियाने विजयरथ रोखला. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हरमनपासून उपकर्णधार स्मृती मानधनाने भारतीयांना मोठी आश्वासने दिली. पुरुष संघाप्रमाणे आम्ही देखील तुम्हाला जल्लोष करण्याची संधी देऊ असे हरमनने सांगताना संघातील मजबूत आणि जमेच्या बाजू सांगून यंदा इतिहास रचला जाईल असे स्पष्ट केले होते. पण, योजनेनुसार काहीच झाले नाही... कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचा एक सामना वगळता भारताला दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.
न्यूझीलंडने टीम इंडियाचा दारुण पराभव करुन टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळले. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताच्या तोंडचा घास पळवला होता. खराब क्षेत्ररक्षण, अतिआत्मविश्वास आणि खेळाडूंमध्ये नसलेली एकी भारताला नेहमीच भारी पडली आहे. याचाच प्रत्यय आशिया चषकात आला. परंतु, रविवारी झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना म्हणजे जणू काही इतिहासाची पुनरावृत्तीच... इथे आशिया चषकात घडले त्याच्या उलट झाले... कमी आत्मविश्वास विरुद्ध अतिआत्मविश्वास या गोंधळात अडकलेल्या भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाची कमी भासली. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेला एकमेव कसोटी सामना वगळता ऑस्ट्रेलियन संघ भारताला नेहमीच वरचढ ठरला आहे. विशेष बाब म्हणजे अनेकदा भारताला निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने टीम इंडियाने ट्रॉफीऐवजी केवळ मने जिंकली असे चित्र होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारताचा पराभव केल्याने चाहत्यांच्या तीव्र भावना आहेत. या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केल्यास धावगतीच्या आकडेवारीवर भारत उपांत्य फेरी गाठणार का हे ठरेल. विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागणार हे साहजिकच. कांगारुंविरुद्ध आत्मविश्वासाची कमी की त्यांची भीती? हा प्रश्न एक चाहता म्हणून पडतो. राष्ट्रकुल स्पर्धा, ट्वेंटी-२० मालिका, वन डे मालिका आणि विश्वचषक... प्रत्येकवेळी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना आत्मविश्वासाची कमी जाणवली आहे. म्हणूनच इतर संघांना चीतपट करणारा 'बलाढ्य' भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच दबावात दिसतो. खरे तर पाकिस्तानच्या पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी जाणवते. दुर्दैवाने असेही म्हणावे लागेल की, दबावात खेळणाऱ्या टीम इंडियाची जहाज कधी बुडेल याची कल्पना न केलेलीच बरी... रविवारी झालेल्या लढतीत कर्णधार हरमनप्रीत कौरने अखेरपर्यंत संघर्ष केला पण इतर शिलेदार ढेपाळल्याने तिला संयम दाखवावा लागला. तिची संथ खेळी ऑस्ट्रेलियाला फायदा देऊन गेली. सर्वाधिकवेळा विश्वचषक जिंकणारा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. पण, कांगारुंचा हा दबदबा मोडून काढण्यासाठी भारताला केवळ आशियात नाही तर जगभरातील संघाविरुद्ध निर्भयपणे खेळणे गरजेचे आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ३५ ट्वेंटी-२० सामने झाले असून, कांगारुंनी ३५ तर भारताला केवळ ७ सामने जिंकता आले आहेत. वने डेमध्ये देखील ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. २०२३ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. फायनलचे तिकीट मिळवून देणाऱ्या या लढतीत टीम इंडिया सहज विजय मिळवेल असे अपेक्षित होते. मात्र, ऐनवेळी हरमनप्रीत कौर हास्यास्पदपणे झालेली धावबाद अन् भारताचा कोसळलेला गड चाहत्यांना निराश करुन गेला. तेव्हा देखील ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवून तमाम भारतीयांना धक्का दिला. त्याआधी राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाने निसटता विजय मिळवत सोनेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वासाची कमी असल्याने टीम इंडियाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.