चंदिगड - भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे पंजाब पोलीस दलातील पोलीस उपाधिक्षकपद ( DSP) काढून घेतले आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या हरमनप्रीतने सादर केलेले पदवी सर्टिफिकेट बनावट असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्यानंतर पद काढून घेण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पंजाब पोलिसांनी हरमनप्रीत कौर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्यास अर्जुन पुरस्कारही काढून घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे महिला क्रिकेट वर्ल्ड कपची स्टार हरमनप्रीत कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. हरमनप्रीतची पदवी बनावट निघाल्यामुळे तीला आता पंजाब पोलिसांमध्ये हवालदारची नोकरी देण्यात येऊ शकते असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या कार्यलयाने स्पष्ट केले आहे.
पंजाब सरकारकडून एक एप्रिल 2018 मध्ये हरमनप्रीत कौर हिला DSP पद देण्यात आले होते. या पदासाठी तिने भारतीय रेल्वेतील नोकरी सोडली होती. DSP पदासाठी हरमनप्रीत कौरने दिलेले पदवीचे सर्टिफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौधरी चरण सिंह विद्यापीठातून ही हे सर्टिफिकेट मिळाले होते. हरमनप्रीतने मोगा येथे 12वीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तिची भारतीय संघात निवड झाली. तिने मेरठ येथून बीएची डिग्री घेतल्याचा दावा तिचे वडील हरमंदर सिंह यांनी केला आहे. 2011मध्ये हरमनप्रीतने आपली पदवी सर्टिफिकेट जमा केली होती.
दरम्यान, हरमनप्रीतनेही हे सर्टिफिकेट बनावट असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. याच सर्टिफिकेटवर मला रेल्वेत नोकरी देण्यात आली होती, तर आताच ते बनावट असल्याचे कसे सिद्ध झाले, असा प्रश्न हरमनप्रीतने केला होता.