Women’s ODI rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) मंगळवारी जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमधील वनडेच्या नव्या क्रमवारीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप कर्णधार स्मृती मानधनाला मोठा फायदा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हमनप्रीत कौर धावांसाठी संघर्ष करताना दिसत होती. पण न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानात तिने दमदार अर्धशतकीसह संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिच्याशिवाय स्मृती मानधनानं विक्रमी शतकासह लक्षवेधून घेतले होते.
शतकी खेळीचा स्मृतीला झाला मोठा फायदा
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर स्मृती मानधना हिने तिसऱ्या सामन्यात दमदार शतकी खेळी साकारली होती. तिने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात १२२ चेंडूत १०० धावांची बहुमुल्य खेळी केल्याचे पाहायला मिळाले. या खेळीचा स्मृतीला रेटिंग पॉइंट्समध्ये मोठा फायदा झाला आहे. ती ७०३ रेटिंगवरुन ७२८ रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.
स्मृती नंबर वनचा ताज मिळवण्याच्या दिशेनं करतीये वाटचाल
महिला एकदिवसीय क्रिकेटमधील बॅटर्सच्या क्रमवारीत नॅटली सायव्हर (७६०) लॉरा वॉल्व्हार्ड (७५६) आणि चामरी अटापट्टू (७३३) या तिघी स्मृती मानधनाच्या पुढे आहेत. पण रेटिंगमध्ये फार मोठे अंतर नाही. त्यामुळे पुन्हा एकदा स्मृती नंबर वनचा ताज मिळवण्याच्या शर्यतीत पोहचलीये, असे म्हटल्यास ते चुकीच ठरणार नाही.
भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरची टॉप १० मध्ये एन्ट्री
हरमनप्रीत कौर न्यूझीलंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुकली होती. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टिकेचा सामना करणाऱ्या हरमनप्रीत कौरनं न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात २४ धावांची खेळी केली. निर्णयाक आणि अखेरच्या वनडेत तिने ६३ चेंडूत ५९ धावांची नाबाद खेळी करत संघाला मालिके जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या खेळीसह वनडे क्रमवारीत तिने ३ स्थानांनी झेप घेत १० व्या क्रमांकावर पोहचली आहे.