harmanpreet kaur : बांगलादेशविरूद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय कर्णधार आगामी दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकणार आहे. एकूणच हरमनप्रीत कौरवर आयसीसीने दोन सामन्यांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. ढाका येथे झालेल्या निर्णायक वन डे सामन्यात हरमनने अम्पायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. याशिवाय सामन्यानंतर बोलताना तिने काही गंभीर आरोप केले होते. याशिवाय ट्रॉफी घेताना अम्पायर्सला बोलवा असे बोलल्याने वाद आणखीच चिघळला.
भारतीय कर्णधार बसणार बाकावर
लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी हरमनला तिच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. खरं तर आगामी काळात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशियाई स्पर्धेत खेळणार आहे. स्मृती मानधना उप कर्णधार असणार आहे. Asian Games 2023 ची स्पर्धा ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये पार पडेल. पण क्रिकेटचे सामने १९ ते २८ सप्टेंबरला होतील. दरम्यान, आयसीसीने भारतीय कर्णधारावर कारवाई केल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघ आता थेट आशियाई स्पर्धेत खेळणार आहे, त्यामुळे हरमनप्रीत कौर Asian Games 2023 स्पर्धेत खेळू शकणार नाही का?. असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पण यावेळी भारतीय कर्णधार नशिबवान ठरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण आशियाई स्पर्धा ही आयसीसीच्या अधिकारात येत नाही आणि त्यामुळे हरमनप्रीत केवळ आयसीसी मान्यता स्पर्धेतील सामन्यांना मुकणार आहे.
हरमन का संतापली?
दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या वादग्रस्त विकेटने अनेकांचे लक्ष वेधले. अम्पायरने बाद देताच हरमनने संताप व्यक्त करत स्टम्पच्या दिशेने बॅट भिरकावली. स्वीप मारण्याच्या प्रयत्नात असलेली हरमन फसली अन् बांगलादेशी खेळाडूंनी विकेटसाठी अपील केली. खरं तर स्लिपमध्ये झेलचा दावा केला त्यासाठी अपील केली गेली. मात्र, अम्पायरने तिला LBW बाद घोषित करताच हरमनचा राग अनावर झाला. हरमनप्रीत १४ धावा करून तंबूत परतली.
भारतीय कर्णधाराचा आरोप
"मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अम्पायरिंगचा हा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अम्पायरिंगसाठी आधीच तयार असू. मी या आधीही सांगितले होते की, इथे अत्यंत खराब अम्पायरिंग आहे. काही निर्णयांमुळे मी दुखावले आहे", असे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर म्हटले.
Web Title: Harmanpreet Kaur suspended for Code of Conduct breach because she angry on umpire in banw vs indw 3rd odi match in dhaka
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.