नवी दिल्ली ।
बीसीसीआयने बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी १५ सदस्यीय भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ यादरम्यान कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात येणार आहे. भारतीय संघाची अनुभवी ऑलराउंडर हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर उपकर्णधारपदी स्मृती मंधानाची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे विश्वचषकानंतर होणारी ही भारतीय संघासाठी प्रमुख टूर्नामेंट असणार आहे.
२८ जुलै पासून रंगणार थरार"अखिल भारतीय महिला निवड समितीने सोमवारी एक बैठक घेऊन बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ साठी भारतीय संघाची निवड केली आहे", असे ट्विट बीसीसीआयने केले आहे. ही पहिलीच वेळ असेल जिथे विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत महिलांचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना पाहायला मिळेल. या बहुचर्चित स्पर्धेची सुरूवात २८ जूनपासून होणार आहे.
दरम्यान, भारतीय महिला संघ ग्रुप ए मध्ये आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, बारबाडोस आणि पाकिस्तान या संघाचा समावेश आहे. श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ग्रुप बी मध्ये स्थान मिळालं आहे. दोन्ही ग्रुपमधील अव्वल स्थानी राहणारे २ संघ उपांत्यफेरीत प्रवेश करतील. भारतीय संघाला साखळी टप्प्यातील तीन सामने खेळावे लागतील.
कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शैफाली वर्मा, मेघना सिंग, तानिया भाटिया, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, एस मेघना, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलील देओल आणि स्नेह राणा.
स्टँडबाय - सिमरन दिल बहादुर, ऋचा घोष आणि पूनम यादव.