नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची (India Womens Team) कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) उपांत्य फेरीच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची यष्टिरक्षक फलंदाज ॲलिसा हिलीने मोठे विधान केले आहे. हरमनप्रीत कौर धावबाद होण्याच्या बाबतीत अनलकी नव्हती असे तिने म्हटले आहे. हरमनने खरोखर प्रयत्न केले असते तर ती क्रीजवर पोहोचली असती असे ॲलिसा हिलीने म्हटले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह भारताचे विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 विकेट गमावून 172 धावा केल्या. 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 8 विकेट गमावून 167 धावा करता आल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरची धावबाद भारतीय संघासाठी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. तिने शानदार अर्धशतक झळकावले पण दुर्दैवाने ती धावबाद झाली आणि सामना भारताच्या हातातून निसटला.
ॲलिसा हिलीचे मोठे विधान हरमनप्रीत कौरने ती धावबाद झाल्यानंतर अनलकी असे म्हटले होते. ॲलिसा हिलीच्या म्हणण्यानुसार, हरमनने योग्य प्रयत्न केला नाही. एबीसी स्पोर्टवरील मुलाखतीदरम्यान तिने म्हटले, "हरमनप्रीत कौर म्हणू शकते की ती खूप अनलकी होती. पण सत्य हे आहे की ती परत आली होती आणि कदाचित क्रीजवरही पोहोचली असती. तिने नीट प्रयत्न केले असते तर तिने दोन मीटरचे अंतर पार केले असते. आता ती म्हणू शकते की अनलकी होते पण त्यावेळी तिने प्रयत्नही केला नव्हता. मला माहिती आहे की आम्ही या सर्व गोष्टी सामन्यादरम्यान बोलतो. तुम्हाला तुमच्या मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तरच तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकता."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"