नवी दिल्ली : सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या (INDW vs ENGW) धरतीवर इंग्लिश संघोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार विजय मिळवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. मराठमोळ्या स्मृती मानधनाने केलेल्या 91 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान संघाला पराभवाची धूळ चारली. कर्णधार हरमनप्रीत कौर (71) आणि स्मृती मानधना (91) यांच्या खेळीमुळे भारताने 7 बळी राखून विजय मिळवला. डावाच्या पहिल्या डावात हरमनप्रीत कौरने घेतलेल्या कॅचची जोरदार चर्चा रंगली आहे, कौरच्या या कॅचवर झुलन गोस्वामीने दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधत आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या डावाच्या 18 व्या षटकात हरमनप्रीतने घेतलेला झेल आकर्षित करणारा आहे. भारताकडून स्नेह राणा ही 18 वे षटक टाकत होती. राणाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इंग्लिश फलंदाज ॲलिस कॅप्सीने जोरदार फटका मारला. चेंडूचा बॅटशी संपर्क होताच चेंडू थेट हरमनप्रीत कौरकडे गेला. कौरने एका हाताने शानदार झेल पकडला आणि इंग्लंडला मोठा झटका दिला. झेल घेताच अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीने कौरचे कौतुक केले.
भारताचा मोठा विजय
एकदिवसीय मालिकेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 मालिका खेळवण्यात आली, ज्यामध्ये यजमान इंग्लंडच्या संघाने 2-1 ने विजय मिळवला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यांबद्दल भाष्य करायचे झाले तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 3 बळींच्या नुकसानात या आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळवला. मानधना, कौर आणि यास्तिका भाटिया यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताला मालिकेत आघाडी घेता आली.
स्मृती मानधनाचे शतक हुकले
भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 91 धावांची शानदार खेळी केली. शतकाला 9 धावा असताना मानधना बाद झाली आणि शतकाला मुकली. मात्र तिच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडवर मोठा विजय मिळवला. मानधना 99 चेंडूत 91 धावांवर खेळत असताना तिला केट क्रॉसने बाद केले. इंग्लंडकडून केट क्रॉस (2) आणि चार्ली डिन (1) याव्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाला बळी घेण्यात यश आले नाही.
Web Title: Harmanpreet Kaur's one-handed catch, Jhulan Goswami's reaction is going viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.