चंदिगड - भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचे पंजाब पोलीस दलातील पोलीस उपाधिक्षकपद ( DSP) धोक्यात आले आहे. तिने सादर केलेले पदवी सर्टिफिकेट बनावट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तिचे पद काढून घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पंजाब सरकारकडून याच वर्षी एप्रिल महिन्यात हरमनप्रीत कौर हिला DSP पद देण्यात आले होते. या पदासाठी तिने भारतीय रेल्वेतील नोकरी सोडली होती. DSP पदासाठी हरमनप्रीत कौरने दिलेले पदवीचे सर्टिफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. चौधरी चरण सिंह विद्यापीठानेही हे सर्टिफिकेट अवैध असल्याचे सांगितले.
हरमनप्रीतने मोगा येथे 12वीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तिची भारतीय संघात निवड झाली. तिने मेरठ येथून बीएची डिग्री घेतल्याचा दावा तिचे वडील हरमंदर सिंह यांनी केला आहे. हरमनप्रीतनेही हे सर्टिफिकेट नकली असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. याच सर्टिफिकेटवर मला रेल्वेत नोकरी देण्यात आली होती, तर आताच ते बनावट असल्याचे कसे सिद्ध झाले, असा प्रश्न हरमनप्रीतने केला आहे.