शारजाह : भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह इंग्लंड, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या तिसऱ्या महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेला आज बुधवारपासून येथे सुरुवात होत आहे. तिन्ही संघ चार सामन्यात एकमेकांविरुद्ध स्वत:चे कौशल्य आणि दमखम पणाला लावणार आहेत. मागच्या दोन स्पर्धेचा विजेता सुपरनोवाज, मागच्यावर्षीचा उपविजेता व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स हे संघ जेतेपदासाठी चढाओढ करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ९ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेत श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंडचेदेखील खेळाडू विविध संंघांतून खेळताना दिसतील. यंदा सर्वच सामने शारजाह येथे होणार असून सायंकाळी ७.३० वाजेपासून सामन्यांना सुरुवात होईल. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखालील सुपरनोवाजने मागच्या दोन्ही स्पर्धेत जेतेपदासह सर्वच सामने जिंकले आहेत. या संघाला सलामीला मिताली राज हिच्या नेतृत्वाखालील व्हेलोसिटीविरुद्ध सामना खेळायचा असून जेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर सुपरनोवाजचा डोळा असेल. हरमनप्रीत मागच्या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये होती. तिने तीन सामन्यात दोन अर्धशतके ठोकली. अंतिम सामन्यात ३७ चेंडूत ठोकलेल्या ५१ धावा जेतेपदात निणार्यक ठरल्या होत्या. भारतीय टी-२० संघाची कर्णधार असलेली हरमन शानदार फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात हरमन चांगली कामिगरी करू शकली नव्हती. जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या कामिगरीकडेदेखील अनेकांच्या नजरा असतील. मागच्या सत्रात मुंबईच्या या खेळाडूने सर्वाधिक १२३ धावा करीत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. मितालीदेखील पुढे येऊन नेतृत्व करण्यात तरबेज मानली जाते. मागच्यावर्षी अखेरच्या षटकात चार गडी गमावल्यामुळे तिचा संघ पराभूत झाला होता. तो हिशेब चुकता करण्याचा मितालीचा प्रयत्न असेल. व्हेलोसिटीची भिस्त १६ वर्षांच्या शेफाली वर्माच्या कामगिरीवरदेखील असेल. टी-२० विश्वचषकात शेफालीने सर्वाधिक ९ षटकार ठोकले होते. कोरोनामुळे सर्वच आंतरराष्ट्रीय खेळाडू फेब्रुवारीनंतर पहिल्यांदा मैदानावर दिसणार आहेत.
सुपरनोवाज : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज (उप कर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), शशिकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकिरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, अयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.व्हेलोसिटी : मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टिरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिब्यादर्शनी, मनाली दक्षिणिनी, लीघ कास्पेरेक, डॅनियल व्हाईट, सुन लूस, जहाँआरा आलम आणि एम. अनघा.ट्रेलब्लेझर्स : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ऋचा घोष, डी. हेमलता, नुज़हत परवीन (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हरलीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादुर, सलमा खातून, सोफी एक्लेस्टोन, नाथकन चंथाम, डींड्रा डोटिन आणि काशवी गौतम.