पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजाम सेठी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नवीन निवड समिती प्रमुखाची सोमवारी घोषणा केली. रमीज राजा यांच्यानंतर सेठी यांनी PCB चा कारभार हाती घेतला. त्यानंतर त्यांनी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची प्रभारी निवड समिती प्रमुख म्हणून निवड केली होती. आफ्रिदीकडेच ही जबाबदारी कायम ठेवली जाईल अशी चर्चा होती, परंतु आज सेठी यांनी पत्रकार परिषद घेऊन हरून राशीद ( Haroon Rasheed) हे नवीन निवड समिती प्रमुख असल्याचे जाहीर केले. पाकिस्तानकडून १३ आंतरराष्ट्रीय सामन्यांत १३८३ धावा करणाऱ्या राशीदकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यावेळी ४ फेब्रुवारीला आशियाई क्रिकेट परिषदेच्या होणाऱ्या बैठकीत आशिया चषक स्पर्धेबाबत जोरदार भूमिका मांडणार असल्याचे सेठी यांनी स्पष्ट केले. हरून राशीद यांनी या नियुक्तीनंतर पीसीबीच्या मॅनेजमेंट समितीतून राजीनामा दिला आहे. दरम्यान, शाहिद आफ्रिदीने पीसीबीने निवड समितीच्या प्रमुखपदावर कायम राहण्याची विनंती केल्याचा दावा केला आहे. पण, वैयक्तिक कारणास्तव आपण ही जबाबदारी स्वीकारली नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
आफ्रिदीला पाकिस्तानसाठी 2 संघ तयार करायचे होते... आफ्रिदीला संघाचे बेंच स्ट्रेंथ सुधारण्यासाठी पाकिस्तानसाठी दोन संघ हवे होते. पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रिदी म्हणाला होता की, "मला बेंच स्ट्रेंथ सुधारण्यासाठी माझ्या कार्यकाळाच्या समाप्तीपूर्वी पाकिस्तानसाठी दोन संघ हवे आहेत. मला वाटते की पूर्वी संवादाचा अभाव होता. मात्र, आता मी वैयक्तिकरित्या खेळाडूंशी बोललो आहे आणि त्यांच्याशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"