आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार संपताच ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक होणार आहे. भारतीय संघाला या स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी टीम इंडियात कोणाकोणाला संधी मिळणार हे अद्याप निश्चित नाही. भारतीय संघात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहण्याजोगे असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात पुन्हा एकदा टीम इंडिया मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर माजी खेळाडू आपापली मत नोंदवत असून, १५ सदस्यीय भारतीय संघ निवडत आहेत.
इरफान पठाण, सुरेश रैना, संजय मांजरेकर आणि रवी शास्त्री यांनी या विषयावर भाष्य केले आहे. अशातच आता हर्षा भोगले यांनी विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे, ज्यामध्ये यष्टीरक्षक लोकेश राहुलला वगळण्यात आले आहे. १ जूनपासून सुरू होणाऱ्या T20 World Cup स्पर्धेसाठी अनेकांनी त्यांचे संभाव्य १५ भारतीय खेळाडू जाहीर केले. 'क्रिकबज'शी बोलताना हर्षा यांनी त्यांच्या मनातील भारतीय संघ जाहीर केला.
हर्षा भोगले यांनी निवडलेला भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल आणि संदीप शर्मा.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट -
- अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
- ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
- क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
- ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ