Join us  

Harsha Bhogle: हर्षा भोगलेंची लाईव्ह मुलाखत सुरू असताना नक्की काय घडलं? त्यांनी दिलं उत्तर; Social Media वर चर्चांना उधाण, पाहा Video

हर्षा भोगले बोलत असताना अचानक कोणी तरी तिथे आलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 10:24 PM

Open in App

Harsha Bhogle Live Interview Video: IPL 2022 ची सुरूवात शनिवार पासून होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कॉमेंट्री पॅनेलमधील सदस्य IPL च्या बायोबबलमध्ये दाखल झाले आहेत. याच दरम्यान सुप्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याबद्दल आज एक विचित्र आणि तितकाच धक्कादायक प्रसंग घडला. हर्षा भोगलेंची एका चॅनेलसोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह मुलाखत सुरू होती. त्यावेळी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना अचानक त्यांची स्क्रीन धुसर (ब्लर) झाली आणि त्यानंतर, 'अरे.. काय चाललंय.. तू कोण आहेस.. असा विचित्र आरडाओरडा ऐकू आला. या साऱ्यानंतर ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल झालाच पण विविध चर्चांनाही उधाण आलं. पण अखेर हर्षा भोगलेंनी स्वत: याबद्दल स्पष्टीकरण दिलं.

नक्की काय घडलं?

हर्षा भोगले हे क्रिकेटस्पोर्ट्सवॉक अशा एका चॅनेलला मुलाखत देत होते. यंदाच्या वर्षी एखादा नवा संघ चांगली कामगिरी करेल की मुंबई आणि चेन्नई यांच्यातच चुरस पाहायला मिळेल, असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्याचं उत्तर देतानाच अचानक त्यांची स्क्रीन ब्लर झाली आणि थोडासा ओरडाआरडा ऐकू आला. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडियावर चर्चांना जोर

घडलेल्या प्रकारानंतर अनेकांनी तर्कवितर्क लढवले. काही युजर्सने हर्षा यांच्याबद्दल नक्की काय घडलं याची विचारणा केली आणि चिंता व्यक्त केली.@ghante56 असं युजरनेम असलेल्या युजरने असा दावा केला की हर्षा भोगलेंची मुलाखत सुरू असताना IPL साठी हर्षा हे मुंबईतील हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. एका चाहता बायोबबलचे सुरक्षाकडे तोडून थेट हर्षा यांच्या रूममध्ये आला, त्यामुळे हलकल्लोळ माजला. याशिवाय, काही युजर्सने हा प्रकार घडल्यानंतर काही वेळाने, हर्षा भोगले हे उत्तम आणि ठणठणीत आहेत, असं सांगितलं.

--

--

--

खुद्द हर्षा भोगलेंनीच ट्वीट करून गोंधळावर टाकला पडदा

या साऱ्या गोंधळानंतर अखेर हर्षा भोगले यांनी स्वत:च ते ठणठणीत असल्याचं स्पष्ट केलं. "मी ठणठणीत आहे. घडलेल्या प्रसंगामुळे तुम्ही सारे घाबरलात त्याबद्दल मला माफ करा. तुम्ही माझ्यावर दाखवलेलं प्रेम आणि काळजी यासाठी आभारी आहे. त्या व्हिडीओमध्ये जे घडलं त्याचा खरा हेतु काही वेगळाच होता. पण ते मला अपेक्षित असल्यापेक्षा खूपच जास्त व्हायरल झालं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांची मी माफी मागतो. तुम्ही दरवेळी काही तरी नवीन शिकता. कधीकधी आपण एखादा छोटासा विनोद घडवायचा प्रयत्न करतो पण त्याची अंमलबजावणी फारच विचित्र पद्धतीने होते आणि त्यातून गोंधळ निर्माण होतो. मला असं करायचं नव्हतं पण तसं घडलं त्यामुळे मी फारच ओशाळलो आहे", असं त्यांनी ट्वीटमध्ये स्पष्ट केलं.

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App