Harshal Patel, IPL 2022 RCB vs CSK: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने स्पर्धेत अप्रतिम सुरूवात केली. RCB ने आतापर्यंत खेळलेले चार पैकी तीन सामने जिंकले. RCB ने मेगा लिलावात काही बडे खेळाडू विकत घेतले. त्यांचा त्यांना खूपच उपयोग होत असल्याचं दिसत आहे. RCB च्या कर्णधारपदाची धुरा यंदा फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर आहे. आज हा संघ चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. पण, शनिवारी घडलेल्या एका वाईट प्रसंगामुळे RCB चा महत्त्वाचा गोलंदाज हर्षल पटेल आजच्या सामन्याला मुकणार असून त्याच्या जागी एक भारतीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
RCBचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल आणि RCBच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी मिळाली. हर्षलच्या बहिणीचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे तो RCBच्या बायो-बबलमधून बाहेर पडला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने संघ सोडला असून तो घरी परतला आहे. तो काही दिवस घरी थांबून मग पुन्हा संघात परतणार आहे. हर्षलच्या बहिणीचा शनिवारीच मृत्यू झाला होता. तिची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. अशा परिस्थितीत RCB चा संघ सिद्धार्थ कौलला पदार्पणाची संधी देऊ शकतो अशी चर्चा आहे.
आरसीबीचा संघ शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला. यामध्ये आरसीबी संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर हर्षल पटेलला त्याच्या बहिणीच्या निधनाची बातमी मिळाली. त्यामुळे त्याने संघाचे बायोबबल सोडले. IPL शी संबंधित एका सूत्राने सांगितले की, दुर्दैवाने हर्षलला त्याच्या बहिणीच्या निधनामुळे बायो-बबल सोडावे लागले. त्याने पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी टीम बस घेतली नाही. तो पुन्हा संघात कधी सामील होणार याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
असा असू शकतो RCB चा संघ- फाफ डू प्लेसिस (क), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली किंवा जोश हेजलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप, सिद्धार्थ कौल