Harshal Patel vs Andre Russell IPL 2022 T20 RCB vs KKR Live Updates: बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात कोलकाताच्या फलंदाजांनी अक्षरश: वाईट कामगिरी केली. प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या KKR ने २० षटकेही पूर्ण खेळली नाहीत. १८.५ षटकांच्या खेळात १२८ धावांवर त्यांचा डाव आटोपला. वनिंदू हसरंगाने ४, आकाश दीपने ३, हर्षल पटेलने २ आणि सिराजने १ गडी माघारी धाडत RCB ला संघात वर्चस्व राखण्यास मदत केली. सामन्यात आंद्रे रसल विरूद्ध हर्षल पटेल असा एक छोटेखानी सामना रंगला, त्यात काय झालं पाहूया.
KKR चे ६७ धावांवर ६ बाद झाले होते. त्यावेळी आंद्रे रसल मैदानात आला. रसलने शांत सुरूवात केली होती, पण त्याला फार काळ शांत ठेवणं शक्य नसल्याचं दिसलं. एका नवख्या स्पिनरला दोन षटकार खेचत रसलने आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर फाफने लगेच हर्षल पटेलला गोलंदाजी दिली. हर्षल पटेलने वेगात चांगलं मिश्रण करत रसलला शांत ठेवलं. त्यानंतर रसलने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पहिल्या चारही चेंडूंवर त्याला एकही धाव घेता आली नाही. अखेर पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबादच झाला आणि या झुंजीत हर्षलचा विजय झाला. पाहा Video
तत्पूर्वी, KKR च्या डावाची सुरूवात खराब झाली. अजिंक्य रहाणे (९), वेंकटेश अय्यर (१०), श्रेयस अय्यर (१३), नितीश राणा (१०) आणि सुनील नरिन (१३) हे पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले. सॅम बिलिंग्स (१४), शेल्डन जॅक्सन (०), टीम साऊदी (१) हेदेखील झटपट माघारी परतले. रसलने सर्वाधिक २५ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. उमेश यादवनेही १८ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यामुळे KKR ने कशीबशी शंभरी गाठली.