virender sehwag haryana election : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग मागील काही दिवसांपासून काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करताना दिसला आहे. त्यामुळे तो राजकीय खेळी सुरू करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आता सेहवाग हरियाणा विधानसभेच्या रिंगणात असलेले काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी मते मागताना पाहायला मिळाला. ते तोशाम या मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. ४८ वर्षीय अनिरुद्ध चौधरी यांना निवडणुकीत त्यांच्याच कुटुंबातील सदस्याचे आव्हान आहे. त्यांची चुलत बहीण श्रुती चौधरी या भाजपाच्या उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील लढाई एकाच कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये होत आहे.
मी अनिरुद्ध चौधरी यांच्याकडे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे पाहतो. त्यांचे वडील रणबीर सिंग महेंद्र यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केले आहे. आज त्यांची मदत करण्यासाठी मी पात्र आहे, त्यामुळेच इथे उपस्थित राहिलो. तोशामच्या जनतेने अनिरुद्ध चौधरी यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन करण्यासाठी इथे आलो आहे, असे वीरेंद्र सेहवागने एका व्हिडीओत म्हटले.
काँग्रेस निश्चित हरियाणात सरकार स्थापन करेल असा मला विश्वास आहे. भाजप सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून, यावेळी जनतेचा कौल काँग्रेसच्या बाजूने आहे. इथे पाण्याची मोठी समस्या आहे, पण सरकारला एकही समस्या सोडवता आली नाही. विकासाचे तर इथे नाव देखील नाही, त्यामुळे आम्ही आगामी काळात या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे अनिरुद्ध चौधरी यांनी सांगितले. खरे तर काही दिवसांपूर्वीच वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासूनच सेहवाग काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.