शेवटपर्यंत रंगलेल्या अंतिम लढीतमध्ये राजस्थानचा ३० धावांनी पराभव करत हरयाणाने विजय हजारे चषकावर कब्जा केला. या स्पर्धेतील हरयाणाचं हे पहिलंच विजेतेपद आहे. हरयाणाने दिलेल्या २८८ धावांच्या आव्हानाचा अभिजित तोमरची शतकी खेळी आणि कुणाल सिंह राठोडच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने जोरदार पाठलाग केला. मात्र अखेरच्या क्षणी हरयाणाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत विजयश्री खेचून आणली. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हरयाणाच्या सुमित कुमारने सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अनिकेत कुमारने (८८ धावा) केलेली दमदार खेळी आणि त्याला कर्णधार अशोक मणेरिया (७०) याने दिलेल्या सुरेख साथीच्या जोरावर हरयाणाने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच केली. तर अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवटिया (२४) आणि सुमित कुमार (२८) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर हरणायाने निर्धारित ५० षटकांमध्ये ८ बाद २८७ धावा फटकावल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव अडखळला. मात्र शतकवीर अभिजित तोमर (१०६) आणि कुणाल सिंह राठोड (७९) यांनी पाचव्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करत राजस्थानला सामन्यात कमबॅक करून दिले. मात्र हे दोघेही बाद झाल्यावर राजस्थानचा डाव अडखळला आणि त्यांचा संपूर्ण संघ २५७ धावांवर गारद झाला. तर हरणायाने ३० धावांनी सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा केला.