मुंबई : संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी लवकरच निवृत्त होणार का? 2018 साली सर्वात जास्त चर्चिला गेलेला हा प्रश्न. 2018 मध्ये त्याने 13 सामन्यांत 275 धावा केल्या आणि त्याच्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात निराशाजनक कामगिरी ठरली. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. अनेकांनी तर धोनीनं युवा यष्टिरक्षकांसाठी संघातील जागा रिक्त करावी असा सल्ला दिला. मात्र, धोनीनं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात या टीकाकारांना कामगिरीतून सडेतोड उत्तर दिले. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघ पाच वन डे सामने खेळणार आहे आणि हा वर्ल्ड कप कदाचित धोनीचा अखेरचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शक्यतेवर निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी आपलं मत व्यक्त केलं.
( विराट, रोहित वर्ल्ड कप संघात हवेच, पण धोनी? निवड समितीचं मोठं विधान )
धोनी सध्या 37 वर्षांचा आहे. टेनिस स्टार रॉजर फेडररचं वयही तितकंच आहे आणि या दोघांनी निवृत्ती घ्यावी असा सल्ला त्यांना दिला जात आहे. मात्र, या दोघांची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. धोनीनं 2019ची सुरुवात दणक्यात केली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन अर्धशतकी खेळी केल्या आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याने पाच वन डे सामन्यांत 121 च्या सरासरीने 242 धावा चोपल्या आणि ट्वेंटी-20त 30.50च्या सरासरीने 61 धावा केल्या. त्यानं आपल्या कामगिरीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. मात्र, इंग्लंडमध्ये होणारा वर्ल्ड कप हा त्याचा अखेरचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याबाबत प्रसाद यांना विचारले असता ते म्हणाले,''धोनीच्या निवृत्तीबाबत आम्ही नक्कीच चर्चा करत नाही. वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेच्या तोंडावर अशा वायफळ चर्चा करून आम्हाला धोनीचं लक्ष विचलित करायचे नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला सर्व ऊर्जा खर्ची घालायची आहे.'' धोनीला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळाली. त्यामुळे 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये धोनी भारतीय संघाचा सदस्य नसणार, अशा चर्चा सोशल साईट्सवर सुरू झाल्या.