- राम ठाकूरकोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आयपीएलचे (इंडियन प्रीमिअर लीग) १३ वे पर्व अधांतरी असल्याचे चित्र आहे. सध्यातरी हे सत्र १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पण, यंदाच्या मोसमात जगातील या सर्वांत चर्चेत असलेल्या क्रिकेट लीगच्या आयोजनावरही प्रश्न उपस्थित झाला आहे. हे सत्र रद्द झाले तर खेळाडूंपासून बीसीसीआय, फ्रॅन्चायझी, प्रसारणकर्ता व प्रशंसकांवर मोठा प्रभाव पडेल, पण हे सत्र झाले नाही तर याची सर्वांत मोठी झळ महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे? नक्कीच याचे उत्तर सकारात्मक राहील. जर आयपीएल झाले नाही, तर धोनीचा भारतीय संघात येण्याचा मार्ग खुंटेल. कारण संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएल हे एकमेव माध्यम होते. याच आशेवर त्याने दडपणानंतरही निवृत्तीचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर टाकला. याच कारणामुळे आयपीएलच्या तयारीसाठी जागतिक क्रिकेटमधील हा दिग्गज खेळाडू पूर्ण क्षमतेने सज्ज झाला. त्याने नेट््समध्ये घाम गाळण्यास सुरुवातही केली होती. काही सराव सामन्यांत शानदार खेळी करीत भविष्यातील योजनाही स्पष्ट केल्या होत्या, पण अचानक कोरोना महामारीमुळे त्याची सर्व तयारी संपुष्टात आली आणि त्याला स्वगृही परतावे लागले. दरम्यान, त्याचे असंख्य चाहते हे संकट संपावे आणि आयपीएल लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी प्रार्थना करीत असतील.निवड समितीचे मतगमतीची बाब म्हणजे धोनीबाबत निवड समितीचे मत कधीच एकसारखे नव्हते. राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी वारंवार सांगितले की भारतीय क्रिकेट धोनीच्या पुढचा विचार करीत आहे. पण, नवनियुक्त निवड समिती अध्यक्ष सुनील जोशी यांनी शास्त्री यांच्या सुरात सूर मिसळताना आयपीएलला धोनीच्या पुनरागमनाचे निकष मानले आहे. अशा स्थितीत जर आयपीएल झाले नाही तर मग निवड समिती धोनीबाबत काय भूमिका घेते याबाबत उत्सुकता आहे.मार्ग खडतरजर आयपीएल-२०२० चे सत्र रद्द करण्यात आले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचे पुनरागमन कठीण भासत आहे. कारण, तो गेल्या आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे संघात पुनरागमनासाठी तो कुठल्याच निकषामध्ये बसणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले. विशेषत: माजी कर्णधार व प्रसिद्ध समालोचक सुनील गावस्कर यांना धोनीचे हे वागणे आवडले नव्हते. गावस्कर यांनी धोनीवर टीका करताना म्हटले होते की, कुणी खेळाडू एवढा प्रदीर्घ काळ स्वत:ला कसा काय अनुपलब्ध असल्याचे सांगू शकतो. त्यांनी पुढे म्हटले होते की, वगळण्यापेक्षा धोनीने स्वत:च क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा.अखेरची टी-२० मालिकाविरुद्ध आॅस्ट्रेलिया (फेब्रुवारी २०१९) : दोन्ही लढतीत भारत पराभूतपहिला सामना विशाखापट्टणम ३७ चेंडूंमध्ये २९* धावा एक चौकारदुसरा सामना हैदराबाद २३ चेंडूंमध्ये ४० धावा ३ चौकार, ३ षटकारसंघव्यवस्थापन काय विचार करते?धोनीच्या पुनरागमनाबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेले नाही. दरम्यान, त्यांनी प्रत्येकवेळी धोनीची पाठराखण केली. धोनीच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी या दिग्गज क्रिकेटपटूला सूर गवसण्यासाठी एक संधी पुरेशी ठरेल, असे म्हटले. पण, भविष्यात धोनी संघाचा भाग राहील किंवा नाही, याचा निर्णय आयपीएल २०२० मधील त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले होते. भारतीय कर्णधार विराट कोहलीही युवा खेळाडूंना संधी देण्याच्या बाजूने आहे. विशेषत: तो युवा रिषभ पंतच्या बाजूने उभा असल्याचे निदर्शनास येते. अलीकडच्या मालिकेमध्ये लोकेश राहुलबाबत जो प्रयोग यशस्वी ठरला त्यामुळे धोनीसाठी धोका निर्माण झाला. यष्टिरक्षक म्हणून राहुलच्या यशामुळे संघ व्यवस्थापनासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला. जर राहुल फलंदाजी व्यतिरिक्त यष्टिरक्षकाची भूमिका बजावणार असेल तर रिषभ पंतसारख्या युवा खेळाडूला केवळ फलंदाज म्हणून सादर करता येईल.