मुंबई: ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत पाकिस्तानवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली. या सामन्यात हसन अलीनं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल पाकिस्तानला महागात पडला. त्यामुळे हसन अलीवर पाकिस्तानात प्रचंड टीका झाली. यानंतर हसन अलीच्या सासरची मंडळी त्याच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहेत.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. त्यामुळे पाकस्तानचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानकडून १९ वं षटक शाहिन आफ्रिदीनं टाकलं. या षटकांत हसन अलीनं एक झेल सोडला. यानंतर मॅथ्यू वेडनं सलग तीन षटकार ठोकत सामना संपवला. हसन अलीनं झेल सोडल्यानंच पाकिस्तान पराभूत झाला म्हणत पाकिस्तानमधील अनेकांनी हसन अलीला जबाबदार धरलं.
हसन अलीची सासरवाडी भारतात आहे. त्याची पत्नी शामिया आरजू मूळची भारताची आहे. त्यामुळे हसन अलीला टार्गेट करण्यात आलं. हसन आणि शामिया यांचा निकाह २० ऑगस्ट २०१९ मध्ये झाला. ती मूळची हरयाणाच्या नूंह जिल्ह्यातल्या मेवातची आहे. हसन अलीचे सासरे लियाकत अली यांनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. झेल सुटल्यानं पाकिस्तानी संघ हरला असं म्हणणारे मूर्ख आहेत. लियाकत यांनी शाहिन आफ्रिदीच होणारे सासरे शाहिद आफ्रिदी यांनाही लक्ष्य केलं.
शाहिद आफ्रिदी माझ्या जावयाला ट्रोल करत असल्याचं मी ऐकलं. त्यांच्या जावयानं पण शेवटच्या षटकांत २२ धावा दिल्या आहेत. ते स्वत:च्या जावयाला का बोलत नाहीत?, असा सवाल लियाकत अलींनी उपस्थित केला. शाहिद आफ्रिदींनी स्वत:च्या जावयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं, तर ते निष्पक्ष असल्याचं समजलं असतं. पण तसं न करता ते केवळ आमच्याच जावयाला बोलत आहेत, असं लियाकत अली म्हणाले.