वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाची खूपच हवा केली गेली होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांचे कौतुक झाले, बाबर आजम याच्यापासून प्रतिस्पर्धी संघाना वाचण्याचा इशारा दिला गेला. पण, प्रत्यक्षात घडलं भलतंच.. पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.. ९ पैकी ४ सामने त्यांना जिंकता आले, त्यात अफगाणिस्ताननेही त्यांना पराभवाचे पाणी पाजले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा १ विकेटने झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागला. ११ नोव्हेंबरला पाकिस्तानने वर्ल्ड कपमधील शेवटचा सामना खेळला. पण, पाकिस्तानी गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) भारतातच थांबला आहे आणि त्याने पत्नीसोबत ताजमहालला भेट दिली. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले.
हसन अलीला वर्ल्ड कप स्पर्धेत ९ विकेट्स घेता आल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याने ७१ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. हसन अलीचे भारतासोबत खास कनेक्शन आहे. हसन आणि त्याची पत्नी सामिया हे दोघे सर्वप्रथम एका रेस्टॉरंटमध्ये डिनर पार्टीदरम्यान भेटले होते. लवकरच दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघांनीही घरच्यांच्या संमतीने लग्न केले. दोघांचे लग्न दुबईत झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे सामिया ही मूळची भारतातील आहे.
हरयाणात जन्मलेली सामिया मागील अनेक वर्षांपासून दुबईत एअर अमीरातीमध्ये काम करत होती. ती एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर होती. तिनं हरयाणा येथील मानव रचना युनिव्हर्सिटीतून बी. टेच ( एरोनॉटीक) ची पदवी घेतली. मागील अनेक वर्षांपासून सामिया दुबईतच स्थायिक झाली आहे. तिचे कुटुंबीय नवी दिल्लीत राहतात. वर्ल्ड कपच्या निमित्ताने हसन अली प्रथमच सासरी आला आणि इथे त्याचे लाड झाले.