नवी दिल्ली : आपल्या कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान पटकावणाऱ्या भारताच्या मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी कोलकाता पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आणि त्यामुळे त्याचे वर्ल्ड कपमध्ये खेळणे अवघड होण्याची चिन्हे आहेत. पत्नी हसीन जहाँने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) पत्र लिहून शमीवर कारवाई कधी करणार, असा सवाल केला आहे.
शमी आणि त्याची पत्नी हसीन यांच्यात बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू आहेत. हसीन जहाँने आपला पती शामीचे बऱ्याच स्त्रियांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर पाकिस्तानमध्येही त्याची एक प्रेयसी आहे. तिच्याबरोबर त्याने दुबईमध्ये काही काळ व्यतित केला आहे, असा आरोपही हसीनने केला होता. त्यानंतर हसीनने शामीवर मॅच फिक्सींग आणि देशाची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर कोलकाता पोलिसांनी शामीची चौकशी केली होती.
शमीवर गुरुवारी IPC 498A ( हुंड्यासाठी छळ) आणि 354A ( शारीरिक छळ) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे वर्ल्ड कप खेळणे धोक्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी 22 जूनला होणार आहे. पत्नी हसीन जहाँच्या तक्रारीनंतर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे. अलीपोर पोलीस कोर्टासमोर कोलकाता पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले आहे.''शमीवर आरोपपत्र दाखल झाल्याचा आनंद आहे. पोलिसांचे मी आभार मानते. आता या प्रकरणात बीसीसीआय शमीवर कधी कारवाई करणार, याची प्रतीक्षा आहे आणि मी बीसीसीआयला तसे पत्र पाठवले आहे. ते शमीवर कारवाई का करत नाही, हे कळेनासे झाले आहे,'' अशी प्रतिक्रीया हसीन जहाँने दिली.
हसीन जहाँ पुढे म्हणाली,''पोलिसांच्या कारवाईमुळे मला दिलासा मिळाला आहे आणि मी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. तो चांगल्या फॉर्मात असताना आणि संपूर्ण देश त्याच्या पाठीशी असतानाही कोलकाता पोलीस आणि बंगालच्या प्रशासनानं मला केलेल्या सहकार्याची मी ऋणी आहे. आरोपांची सर्व पुरावे मी सादर केलेली आहेत. पुढील तपास सर्व सत्य उघडकीस आणेल. देवावर आणि न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे.''