- व्हीव्हीएस लक्ष्मण
भारताने लॉर्डस्वर सपशेल लोटांगण घातल्याचे पाहून मनाला वेदना झाल्या. एजबस्टन कसोटीत झुंजारवृत्ती दाखविल्यानंतर येथे शरणागती पत्करणे चांगले नव्हते. इंग्लंडने परिस्थितीचा अलगद लाभ घेतला, त्याचवेळी संकटांवर मात देखील केली. पण भारताने कचटाऊ वृत्तीचे दर्शन घडविले. फलंदाजीच्यावेळी ते प्रकर्षाने दिसून आले.
खेळाडूंच्या अपयशात जितक्या तांत्रिक उणिवा होत्या तितकाच आत्मविश्वासाचाही अभाव होता. देहबोलीतूनही याचा वेळोवेळी प्रत्यय आला. तुम्ही स्वत:च्या कर्तृत्वावर शंका घ्यायला लागता तेव्हा काही चांगले घडेल, याची शक्यता संपुष्टात येते. याचे आत्मपरीक्षण व्हावे. प्रत्येक सदस्याने स्वत:ला आरशापुढे प्रश्न विचारावा. प्रामाणिक उत्तर द्यावे. ०-२ ने माघारल्यानंतरही मालिकेत मुसंडी मारू शकतो का, याचा गंभीर
विचार करावा. हे शक्य आहे, पण त्यासाठी आधी मनातील गोंधळ संपवायला हवा.
परदेशात मागील दहा डावांमध्ये भारताने केवळ दोनदा २५० वर धावा केल्या आहेत. दोन्ही वेळा विराटच्या शतकाचा समावेश होता. फलंदाजांच्या खेळावर नजर टाकल्यास आधी इंग्लंडमध्ये खेळलेले हेच अनुभवी फलंदाज होते, असे वाटले नाही. चाहत्यांना ते अपेक्षित होते. जेम्स अॅन्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या समावेशामुळे इंग्लंडकडे अव्वल दर्जाचा मारा होता हे खरे आहे पण फलंदाज त्यांना खेळू शकले नसते काय? याउलट भारतीय गोलंदाजांना इंग्लिश फलंदाजांनी खेळून काढलेच ना! यजमान गोलंदाजांनी पहिल्या डावात आमच्या फलंदाजांना स्विंगच्या जाळ्यात ओढले तर दुसऱ्या डावात स्विंग प्रभावी ठरत नाही हे ध्यानात येताच ‘कटर’चा वापर केला. पहिल्या डावात १०७ धावांत ढेपाळलो हे समजृू शकतो पण दुसºया डावात भरपाई शक्य होती. याचा अर्थ आम्ही नशिबावरच अधिक विसंबून राहिलो. नॉटिघम कसोटीला सामोरे जाण्याआधी संघ व्यवस्थापनाने याचा गंभीर विचार करावा.
संघ निवडीत पारदर्शीपणा आणि संवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. पावसाच्या व्यत्ययात अंतिम अकरा जणांची निवड करण्यात आली तेव्हा उमेशऐवजी कुलदीपला संधी देण्याचा विचार कसा काय आला.
इंग्लंडच्या फलंदाजांनी हार्दिक पांड्या याला वगळता सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. जॉनी बेयरोस्टो आणि ख्रिस व्होक्स यांच्यातील भागीदारी भारतीय गोलंदाजी ढेपाळल्याचा प्रत्यय देत होती. पुढील सामन्यातही यजमान संघ भारताला धूळ चारण्यास सज्ज असेल, पण भारताने गाफिल राहू नये. खेळाडूंनी स्वत:वर विश्वास राखण्याखेरीज भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा होणार नाही,
हेच खरे.
Web Title: Have confidence in yourself to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.