मुंबई : क्रिकेटमध्ये आतापर्यंत भरपूर वेगवान गोलंदाज तुम्ही पाहिले असतील, पण आतापर्यंतचा वेगवान चेंडू मात्र तुम्ही पाहिला नसेल...
क्रिकेटमध्ये आतापर्यंतचे वेगवान चेंडूचे विश्वविक्रम तुम्हाला माहितीही असतील. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीने २००४ भारताच्या दौऱ्यावर असताना ताशी १६४ किलोमीटर एवढ्या वेगाने चेंडू टाकला होता. आतापर्यंत क्रिकेट विश्वातील हा सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. यापूर्वी हा विश्वविक्रम पाकिस्तानचाच रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या शोएब अख्तरच्या नावावर होता. अख्तरने १६१ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चेंडू टाकला होता. पण यापेक्षाही वेगवान चेंडू पडल्याचे पाहायला मिळाले आहे. हा चेंडू कोणी, कसा आणि कधी टाकला, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल...
हा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या नावावर आहे आणि त्याने हा सर्वात वेगवान चेंडू भारताच्या फलंदाजासमोर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात आली होती. या मालिकेत भारताने विजय मिळवला होता.
सध्याच्या घडीला युवा (१९-वर्षांखालील) विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यामध्ये हा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वाल त्यावेळी फलंदाजी करत होता. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मतिशा पथिराना याने हा जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. या चेंडूचा वेग होता तब्बल ताशी १७५ किलोमीटर...