नवी दिल्ली, दि. 9 - सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये काही मोजक्या खेळाडूंमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. अशा खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश होतो. विराटने आपल्या फलंदाजीच्या बळावर अनेक सामन्यांमध्ये भारताला अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिले आहेत. नुकत्याच संपलेल्या श्रीलंका दौ-यात लंकन गोलंदाजांनी विराटच्या बॅटचा तडाखा अनुभवला.
विराट मूळचा रायटी फलंदाज आहे. रायटी बॅटींग करताना विराटच्या बॅटमधून निघणारे स्ट्रोक जितके आकर्षक वाटतात, तितकीच त्याची लेफ्टी बॅटींगही तुम्हाला प्रेमात पाडेल. विराट रायटी असला तरी, तो लेफ्टी फलंदाजीही तितक्याच सहजतेने करतो. त्याच्या फटक्यांमध्ये तितकीच ताकत जाणवते. विराट रायटी नसून लेफ्टी असता तरी तो तितकाच धोकादायक फलंदाज ठरला असता असे त्याची फलंदाजीपाहून वाटते. श्रीलंका दौ-यावर विराट रस्त्यावर मुलांसोबत क्रिकेट खेळला. त्यावेळी त्याने रायटी ऐवजी लेफ्टी फलंदाजी केली. विराटने त्याच्या लेफ्टी बँटींगचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. पण नंतर त्याने तो डिलीट केला.
पण विराटच्या एका चाहत्याने पुन्हा एकदा टि्वटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. श्रीलंका दौ-यात कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकेत भारताने श्रीलंकेला 5-0 असा व्हाईटवॉश दिला. विराटने या दौ-यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या 30 शतकांशी बरोबरी केली. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणा-या खेळाडूंच्या यादीत विराट आता पाँटिंगसह दुस-या स्थानावर आहे. पाँटिंगला 30 शतकांसाठी 349 सामने खेळावे लागले. विराटने अवघ्या 186 सामन्यातच हा टप्पा गाठला आहे.