कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज रमीझ राजा याने मॅच फिक्सिंगचा गुन्हेगारी श्रेणीत समावेश करून दोषींना कोठडीची शिक्षा सुनावण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोरोना रोखण्यासाठी ज्या पद्धतीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याच गतीने फिक्सिंगला आळा घालण्यासाठी पाऊल उचलण्याची मागणी रमीझने केली. पीसीबीने उमर अकमलला सोमवारी तीन वर्षे बंदीची शिक्षा सुनावली. यावर प्रतिक्रिया देताना रमीझने उमरदेखील मूर्खांच्या यादीत सहभागी झाल्याचे म्हटले होते.
याशिवाय रमीझने झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मपुमेलेलो मबांग्वा याच्यासोबत समाजमाध्यमांवर चर्चा केली. मबांग्वाने टिष्ट्वट केले, ‘माझ्या मते, फिक्सिंगच्या लढाईत दुष्ट लोकांचा विजय होत आहे.
अकमलने असे केले नसावे? कोठडीच्या शिक्षेने अशा दुष्टांवर विजय मिळविता येईल,असे वाटत नाही काय? याचे उत्तर देत रमीझ म्हणाला, ‘फिक्सिंगचा सफाया करण्यासाठी सर्व हितधारकांनी एकवटायला हवे. कोठडीची शिक्षा यासाठी उपायकारक ठरू शकते. कोरोनाच्या लढाईत जे प्रयत्न होत आहेत, तसेच प्रयत्न फिक्सिंगविरुद्ध क्रिकेट जगताने करायला हवे. फिक्सिंगसारख्या प्रकारांमुळे अनेक प्रतिभावान खेळाडू उद्ध्वस्त होतात.’ (वृत्तसंस्था)
>तीन वर्षे बंदी ही कठोर शिक्षा, उमर आव्हान देईल-कामरान
सट्टेबाजांनी संपर्क केल्याची सूचना बोर्डाला देण्यात अपयशी ठरलेला फलंदाज उमर अकमल याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी तीन वर्षे बंदीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा फारच कठोर असल्याची प्रतिक्रिया देत उमरचा मोठा भाऊ कामरान अकमल याने उमर याला निश्चित आव्हान देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पाक संघाबाहेर असलेला माजी यष्टिरक्षक-फलंदाज कामरान याने या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला,‘ उमरला दिलेल्या कठोर शिक्षेचे मला आश्चर्य वाटले.तो निश्चितपणे बंदीला आव्हान देईल. अशाच प्रकाराच्या आरोपात याआधी पीसीबीने अन्य खेळाडूंना फारच किरकोळ शिक्षा दिली होती.’ देशाकडून ५७ कसोटी, १५३ वन डे आणि ५८ टी-२० सामने खेळलेला कामरान पुढे म्हणाला, ‘याआधी अनेक खेळाडूंनी असा अपराध केला तेव्हा त्यांना फार कमी वेळेच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली. कामरानबाबत इतका कठोर निर्णय का झाला, याचा शोध घ्यावा लागेल.’ कामरानने मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नवाज यांच्या शिक्षेकडे इशारा केला. या दोघांवर सट्टेबाजांशी झालेल्या संपर्काची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप होता. त्यांना कमी कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Web Title: Havi-Rameez Raja should be jailed for match-fixing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.