दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने बुधवारी अव्वल स्थानावर झेप घेतली. त्याने इंग्लिश कर्णधार जो रुटला मागे टाकले. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क नवव्या स्थानी दाखल झाला, तर भारताचा कर्णधार विराट कोहली हा सहाव्या वरुन सातव्या स्थानावर घसरला आहे.
२०१९च्या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला दुखापत झाली. त्याच्या जागी लाबुशेनला संघात घेण्यात आले. ही संधी साधत लाबुशेन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा आधार बनला. भारताचा रोहित शर्मा पाचव्या स्थानी कायम आहे. लाबुशेनचे ९१२ रेटिंग गुण आहेत, तर रुट ८९७ गुणांसह दुसऱ्या, स्टीव्ह स्मिथ (८८४) तिसऱ्या, केन विलियम्सन (८७९) चौथ्या ,रोहित शर्मा (७७५) पाचव्या तर विराट कोहली ७५६ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत पॅट कमिन्सपाठोपाठ भारताचा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर कायम आहे. टी-२० फलंदाजीत पाकचा कर्णधार बाबर आझम डेव्हिड मलानसोबत संयुक्तपणे अव्वल आहे. सलामीवीर मोहम्मद रिझवान ७९८ गुणांसह तिसऱ्या, तर लोकेश राहुल पाचव्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.