नवी दिल्ली : इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कीमो पॉलला मैदानात क्षेत्ररक्षण करताना जबर दुखापत झाली. ही दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची होती की, त्याला उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे मैदानात पॉलसाठी स्ट्रेचर आणले गेले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही घटना घडली. तिसऱ्या दिवशी चौथे षटक शॅनन गॅब्रियल टाकत होता. यावेळी शॅननच्या गोलंदाजीवर जो डेन्लीने एक फटका मारला. हा फटका अडवण्यासाठी जात असताना पॉलला दुखापत झाली. बॉलचा पाठलाग करताना त्याचे स्नायू ताणले गेले आणि त्यानंतर त्याला उठताही येत नव्हते. वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने यावेळी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, " पॉलच्या स्नायूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे तो चहापानापर्यंत तरी मैदानात येऊ शकत नाही."
पॉलला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्याचे कळत आहे. त्यामुळे या सामन्यात त्याला खेळता येणार नाही. पॉलला या दुखापतीमधून बाहेर येण्यासाठी जवळपास दीड महिना लागू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत तो खेळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
ख्रिस गेलचे संघात पुनरागमनधावांचा बकासुर म्हटला जाणारा ख्रिस गेल तब्बल 18 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वेस्ट इंडिजच्या संघात परतणार आहे. गेलचे संघात पुनरागमन हे वेस्ट इंडिजसाठी फायद्याचे ठरणार आहे. कारण आगामी विश्वचषक स्पर्धेत गेल खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल जुलै 2017मध्ये आपला अखेरचा सामना वेस्ट इंडिजसाठी खेळला होता. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघाने दमदार कामगिरी केली होती. वेस्ट इंडिजला आता एकदिवसीय मालिका जिंकायची असल्यामुळे गेलचे पुनरागमन त्यांच्या पथ्यावर पडणार आहे
वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळ आणि काही नामांकित खेळाडूंमध्ये वाद झाले होते. त्यानंतर गेल बऱ्याचदा संघाबाहेर होता. क्रिकेट विश्वातील वेगवेगळ्या लीगमध्ये तो खेळत असल्यामुळे त्याने देशाकडून खेळण्यास प्राधान्य दिले नव्हते. पण आता आयपीएल आणि त्यानंतर होणारी विश्वचषक स्पर्धा गेलला खेळायची आहे. या स्पर्धांसाठी आपली चांगली तयारी व्हावी, म्हणून गेल वेस्ट इंडिजच्या संघात परतला असल्याचे म्हटले जात आहे.