IND vs ENG: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने द्विशतकी खेळी करून सर्वांची मनं जिंकली. त्याने २३१ चेंडूत १० षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने २०० धावांचा आकडा गाठला. यशस्वी जैस्वाल २१४ आणि सर्फराज खान ६८ धावा करून नाबाद परतले. भारताने ४३० धावांवर डाव घोषित केला असून इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांची आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघातून खेळताना स्फोटक खेळी करून जैस्वालने भारतीय संघाचे तिकिट मिळवले.
दरम्यान, यशस्वी जैस्वालने राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी १२२ चेंडूत १०४ धावांची शतकी खेळी केली. त्याने चौथ्या दिवशी या खेळीचे रूपांतर द्विशतकात केले. जैस्वालने शतक झळकावल्यानंतर त्याच्या एका चाहतीने एक अनोखी पोस्ट केली. विशेष बाब म्हणजे केवळ सात कसोटी सामन्यांमध्ये त्याला दोनवेळा द्विशतक झळकावण्यात यश आले.
जैस्वालच्या खेळीला दाद देताना त्याच्या एका चाहतीने पोस्ट केली, ज्याला राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीने दाद दिली. तिने म्हटले की, कोण आहे यशस्वी जैस्वाल? अंध व्यक्तींसाठी जैस्वाल हा प्रकाश आहे. भुकेल्यांसाठी जैस्वाल भाकरी आहे. आजारी लोकांना बरे करण्याचे तो औषध आहे. एकाकी पडलेल्यांसाठी जैस्वाल कंपनी आहे. दुःखी लोकांसाठी तो आनंदाची आशा आहे. कैद्यासांठी जैस्वाल हे एक स्वातंत्र्य आहे. माझ्यासाठी जैस्वाल सर्वकाही आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज.
तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड व जेम्स अँडरसन.