आज क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे गौतम गंभीर व श्रीसंत यांच्यातल्या वादाची... लीजंड्स लीग क्रिकेटच्या एलिमिनेटर सामन्यात या दोघांमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये नेमकं काय घडलं हे कुणालाच माहित नव्हतं अन् एस श्रीसंतने सामन्यानंतर पोस्ट केलेल्या व्हिडीओतही त्याने गंभीर नेमकं काय म्हणाला हे सांगितले नाही. पण, आत त्याने इंस्टा लाईव्हमध्ये हे प्रकरण उलगडताना गंभीरवर आरोप केले आहेत. श्रीसंतच्या इंस्टा लाईव्हचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंस्टा पोस्टमध्ये गंभीर सातत्याने एक शब्द वापरून त्रास देत असल्याचे श्रीसंतने लिहिले होते. अम्पायर्सनीही त्याला ताकीद दिली, परंतु त्याने त्याचेही ऐकले नाही. ''मी एकही अपशब्द वापरला नाही किंवा काहीच वाईट म्हणालेलो नाही. तू काय म्हणत आहेस? तू काय म्हणत आहेस? हेच मी त्याला वारंवार विचारत होतो. तो फक्त डिवचण्यासाठी हसत होता. तो मला सातत्याने फिक्सर, फिक्सर, तू फिक्सर आहेस @#### असे टोमणे मारत होता. त्याने शिवीगाळही केली. अम्पायरनेही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही तो मला फिक्सर म्हणाला,''असे श्रीसंतने इंस्टा लाईव्हमध्ये म्हटले.
२०१३च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत दोषी आढळला होता. बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती, परंतु श्रीसंतने त्याविरोधात न्यायालयीन लढा दिला आणि दोन वर्षानंतर याच प्रकरणात श्रीसंतची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये केरळ उच्च न्यायालयाने आजीवन बंदी पुन्हा लागू केली. मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने BCCI ची आजीवन बंदी मागे घेतली आणि बोर्डाला नव्या शिक्षेची सूचना केली. बीसीसीआयने ७ वर्षांची बंदी घातली आणि ही शिक्षा पूर्ण करून १३ सप्टेंबर २०२० पासून तो पुन्हा क्रिकेटमध्ये परतला.
"मी जास्त भांडवल करणार नाही आणि चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी जे अनेक सेलिब्रिटी करतात ते सर्व करणार नाही. मला फक्त थेट तुमच्यापर्यंत यायचं होतं. तो PR करू शकतो आणि त्यासाठी पैसा खर्च करू शकतो. मी एक सामान्य माणूस आहे. हे सत्य आहे. तो फक्त माझ्याच नाही तर बर्याच लोकांशी हे करत आहे. त्याने हे का सुरू केले हे मला माहीत नाही. त्याचे लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतील पण माझी तुम्हाला विनंती आहे की, त्यात पडू नका," असे श्रीसंत म्हणाला.