अबुधाबी : दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जसे यश मिळविले त्या प्रमाणात भारतीय संघातर्फे त्याची कारकीर्द फुलली नाही, पण या लेगस्पिनरने याबाबत विचार करणे सोडले आहे. मिश्राने आयपीएलमध्ये १४८ सामन्यांत १५७ बळी घेतले आहेत. तो या लीग स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत लसित मलिंगानंतर दुसºया स्थानी आहे.
सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना मिश्रा म्हणाला, ‘अन्य गोलंदाजांच्या तुलनेत मी कमकुवत आहे किंवा नाही, याची कल्पना नाही. मी सुरुवातीला याबाबत बराच विचार करीत होतो आणि त्यामुळे लक्ष विचलित होत होते. आता केवळ खेळावर लक्ष केंद्रित करतो.मला आपल्या क्रिकेट व गोलंदाजीवर लक्ष द्यावे लागते आणि ते मी करीत आहे.’तेवतिया व अमित मिश्रा दोघेही हरियाणाचे आहेत आणि २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सतर्फे खेळले होते. राजस्थान रॉयल्सतर्फे खेळताना तेवतियाने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध १८ व्या षटकात पाच षटकार ठोकत सामन्याचे चित्र पालटले.सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीपूर्वी बोलताना मिश्रा म्हणाला, ‘तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करीत होता. ज्याप्रकारे रविवारी त्याने खेळी केली ती हरियाणा क्रिकेटच्या भविष्यासाठी चांगले संकेत आहेत. भविष्यातही त्याने अशीच कामगिरी करावी, असे मला वाटते. माझ्या मते तो चांगला खेळू शकतो, पण रविवारी तो ज्या प्रकारे खेळला त्याचा मी कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारची खेळी वारंवार अनुभवाला मिळत नाही. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक होती.’या ३७ वर्षीय गोलंदाजाने हरियाणाचा आपला सहकारी गोलंदाज राहुल तेवतियाची प्रशंसा केली. तो म्हणाला, ‘आयपीएलमध्ये संस्मरणीय खेळी करीत राहुल तेवतियाने छाप सोडली आहे.’