पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात आफ्रिदीनं काश्मीर आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली. आफ्रिदीच्या या विधानानंतर नेटिझन्सनी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांना टार्गेट केले. आफ्रिदीच्या विधानाचा चांगला समाचार घेताना भज्जीनं त्याला मर्यादा ओलांडू नकोस, असा सज्जड दम भरला.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करत आहे. त्याच्या या समाजकार्याला युवराज आणि भज्जीनं पाठिंबा दिला. आफ्रिदीच्या समाजकार्याला मदत करा, असं आवाहनही दोघांनी केलं होतं. त्यावेळी युवी व भज्जीवर चौफेर टीका केली. पण, आफ्रिदीच्या या नव्या वादग्रस्त विधानानंतर युवी आणि भज्जी यांना टार्गेट केले गेले.
आफ्रिदीच्या वादानंतर युवी म्हणाला,''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल शाहिद आफ्रिदीनं केलेल्या विधानाबद्दल मी खूप निराश आहे. एक भारतीय म्हणून असं विधान मी खपवून घेणार नाही. त्याच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहन मी माणुसकीच्या नात्यातून केलं होतं. पण, पुन्हा तसं करणार नाही.''
India Today शी बोलताना भज्जी म्हणाला की,''पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. तो समाजकार्य करत होता आणि माणूसकी म्हणून मी व युवीनं त्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. पण, आफ्रिदी आमच्या देशाला आणि पंतप्रधानांना नाव ठेवत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही. यापुढे आफ्रिदीसोबत मैत्री ठेवणार नाही. त्यानं त्याची मर्यादा ओलांडू नये, अन्यथा त्याची लायकी दाखवून देऊ.''
आफ्रिदी काय म्हणाला होता?
व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत आहे.
यानंतर आफ्रिदीने काश्मीरवरुन संताप व्यक्त केला. नरेंद्र मोदी सर्वात डरपोक माणूस आहे. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की त्या ७ लाख सैनिकांच्या मागे आणखी २२-२३ कोटी सैन्य आहे आणि आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
तरीही ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागताय, गंभीरने शाहीद आफ्रिदीला सुनावलं
गंभीरने शाहिद आफ्रिची खिल्ली उडवत, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला. गौतमने पाकिस्तानच्या या तिन्ही महाशयांचा उल्लेख जोकर म्हणून केला आहे. पाकिस्तानजवळ ७ लाख सैन्य असून २० कोटी लोकं या सैन्याच्या पाठीशी आहेत, असं १६ वर्षीय शाहिद आफ्रिदीने म्हटलंय. तरीही ७० वर्षांपासून काश्मीरसाठी भीक मागत आहेत, असे कडक उत्तर गंभीरने दिले आहे. आफ्रिदी, बाजवा आणि इम्रान खानसारखे लोकं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विष पसरवण्याचा काम करतात. ज्यातून पाकिस्तानी लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांग्लादेश लक्षात आहे ना?, असे म्हणत गौतमने आफ्रिदीचा गंभीरतेने समाचार घेतला.
Web Title: 'He should stay in his limits'; Harbhajan Singh lashes out at Shahid Afridi over Kashmir remarks svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.