Cheteshwar Pujara Team India, IND vs AUS 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाने ९ बाद २५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्यानंतर भारतीय फलंदाजांकडूनही दमदार खेळाची अपेक्षा होती. पण केएल राहुल (८४) आणि रविंद्र जाडेजा (७७) वगळता वरच्या आणि मधल्या फळीतील एकाही फलंदाजाने जबाबदारी ओळखून खेळ केला नाही. ९ गडी बाद झाल्यानंतर भारताला फॉलोऑन टाळायला २० पेक्षा जास्त धावांची गरज होती. त्यावेळी दिवसाचा खेळ संपेपर्यंत शेवटच्या विकेटसाठी आकाश दीप (नाबाद २७) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद १०) यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी करत फॉलोऑन वाचवला. भारतीय फलंदाजांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. पण तरीही भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने एका अनुभवी खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले.
७४ धावांवर ५ गडी बाद झालेले असताना केएल राहुल आणि रविंद्र जाडेजा दोघे मैदानात होते. राहुलला दुसऱ्या बाजुने हवी असलेली साथ जाडेजाकडून मिळाली. इतकेच नव्हे तर राहुल बाद झाल्यानंतरही जाडेजाने संघाला द्विशतक गाठून दिले आणि ७७ धावांची दमदार खेळी केली. दिग्गज फलंदाज जेथे झटपट बाद झाले, त्या खेळपट्टीवर जाडेजाने चांगली झुंज दिली. त्याने १२३ चेंडूंचा सामना केला आणि ७७ धावा केल्या. आपला डाव त्याने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने खुलवला. त्याच्या याच खेळीची पुजाराने स्तुती केली.
"जाडेजा आणि राहुल यांच्यातील भागीदारी भारताच्या डावातील खूपच महत्त्वाची भागीदारी होती. त्या भागीदारीमुळे आता सामन्यात थोडी तरी रंगत आली आहे. राहुलने दाखवून दिले की तुम्ही फलंदाजीत संयम बाळगलात, शांतपणे खेळलात तर या पिचवर धावा करणे शक्य आहे. फलंदाजी शक्यच नाही किंवा धावा करता येणे शक्यच नाही अशा प्रकारचे हे पिच मुळीच नाही. मला इथे जाडेजाचेही कौतुक करावेसे वाटते. राहुलने फलंदाजी केलीच, पण त्याला अपेक्षित साथ जाडेजाने दिली. सातव्या क्रमांकावर एक फलंदाज हवा म्हणून त्याला संघात घेतले होते आणि त्याने त्याची संघातील निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं," अशा शब्दांत पुजाराने आपले मत मांडले.
दरम्यान, पहिल्या दोन कसोटीत जाडेजाला संघात घेण्यात आले नव्हते. पण जाडेजाचा ऑस्ट्रेलियात फलंदाजीचा रेकॉर्ड खूप दांडगा आहे. त्याने ५८.५० च्या सरासरीने सहा डावांत २३४ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर १४ बळीही आहेत.