नवी दिल्ली : बीसीसीआयची खेळाडूंची करार संरचना कशी असावी, भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी क्रिकेपटूंकडून काही सल्ले मागवले होते. त्यावेळी करारामध्ये ' अ+' ही नवीन गटवारी असायला हवी, असे महेंद्रसिंग धोनीने सुचवले होते. बीसीसीआयने हा नवीन गट तयार केलादेखील, पण त्यामधून धोनीलाच वाटाण्याचा अक्षता देण्यात आल्या आहेत.
भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधार विराट कोहली, महेंद्रिसंग धोनी आणि रोहित शर्मा यांच्याशी एक बैठ करून करार संरचना कशी असावी, याबाबत चर्चा केली होती. काही वेळाने कुंबळे यांना प्रशिक्षकपद सोडावे लागले. त्यावेळी या तिन्ही खेळाडूंनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही संरचना बीसीसीआयने अमंलात आणण्याचे ठरवले.
धोनीने सुचवलेल्या करार गटवारीत तोच कसा नाही, असे प्रश्न यायला सुरुवात झाल्यावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या प्रश्नाला उत्तरही दिले आहे. " जे खेळाडू कसोटी, वनडे, ट्वेन्टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये खेळत आहेत आणि ज्यांनी क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे त्यांना या गटात स्थान देण्यात आलेले आहे. सध्या धोनी हा कसोटी क्रिकेट खेळत नसल्याने त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही," असे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
बीसीसीआयने नव्याने ' अ+' गट सुरु केला आहे. या गटामध्ये कोहली, रोहित, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. या खेळाडूंना सात कोटी रुपये ऐवढी रक्कम कराराद्वारे मिळणार आहे.