नवी दिल्ली : आपल्या घरातील व्यक्तीला थोडी जरी दुखापत झाली तर आपण त्याची काळजी घेतो. पण त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये असताना तो चक्क देशासाठी लढत होता. तो फक्त लढलाच नाही तर त्याने आपल्या कामगिरीने तिरंगाही फडकावला. ही गोष्ट आहे एका योद्ध्याची. क्रिकेट विश्वातील एका निखळ ताऱ्याची. ही गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 193 धावांची देदिप्यमान खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराची.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुजाराच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात तर पुजाराने 193 धावांची दमदार खेळी साकारली. पण पुजारा जेव्हा मैदानात आपल्या देशासाठी लढत होता, आपले कर्तव्य बजावत होता तेव्हा त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.
पुजाराचे वडील अरविंद आपल्या मुलाची खेळी पाहू शकले नाहीत. कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अरविंद यांचे हृदय व्यवस्थित कार्य करत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेव्हा त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले तेव्हा पुजारा फलंदाजी करत होता. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाची फलंदाजी पाहता आली नाही. पण लोकांच्या चर्चेमधून चेतेश्वर चांगली फलंदाजी करत असल्याचे कळत होते. लोकं चेतेश्वरबद्दल भरभरून बोलत होती, हे सारं पाहून मला फार आनंद झाला, असे अरविंद पुजारा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.