भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं टीम इंडियात आक्रमकपणा आणला. आरे रे कारे... करण्याचा स्वभाव असलेल्या गांगुलीनं टीम इंडियाला परदेशात जिंकण्याची सवय लावली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अनेक तारे मिळाले आणि त्यापैकीच एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी... गांगुली आता भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचा ( BCCI) अध्यक्ष आहे. दादाच्या नेतृत्वाखाली कॅप्टन कूल धोनीनं पदार्पण केलं होतं आणि पाकिस्तान दौरा त्यानं गाजवला होता.
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) हे महेंद्रसिंग धोनीच्या फॅन झाले होते. २००६मध्ये जेव्हा टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती, तेव्हा धोनीच्या फलंदाजीची चर्चा संपूर्ण जगात सुरू होती. मुशर्रफ यांनीही धोनीचं कौतुक केलं होतं आणि त्याच्या हेअरस्टाईलवरही कमेंट केली होती. त्याच मालिकेदरम्यानचा एक प्रसंग गांगुलीनं सांगितला. २००६ च्या त्या दौऱ्यावर मुशर्रफ यांनी धोनीबाबत एक प्रश्न गांगुलीला विचारला होता. त्यावर गांगुलीनं खूप चांगलं उत्तर दिले.
गांगुलीनं त्या प्रसंगाची आठवण सांगितली, तो म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीला कुठून आणलं, असा प्रश्न मला मुशर्रफ यांनी विचारला होता. तेव्हा मी त्यांना सांगितले होती की, वाघा बॉर्डरवर तो असाच भटकत होता आणि आम्ही त्याला उचलून संघात सहभागी करून घेतले. ''
वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग आदी खेळाडू गांगुलीच्या नेतृत्वाखाली घडले. हेच खेळाडू नंतर टीम इंडियासाठी मॅच विनरही ठरले. गांगुलीनं ११३ कसोटींत ४२.१४ च्या सरासरीनं ७२१३ धावा केल्या आणि ज्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. ३११ वन डे सामन्यात ४१.०२ च्या सरासरीनं ११३६३ धावा केल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकं आहेत.