‘जो कधीच हार मानत नाही = अजिंक्य’

प्रत्येक खेळाडूला अपयशाला सामोरे जावे लागते; परंतु जो खेळाडू अपयशाकडे संधी म्हणून पाहतो, तो अजिंक्य रहाणे बनतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 08:24 AM2023-05-07T08:24:12+5:302023-05-07T08:25:28+5:30

whatsapp join usJoin us
"He Who Never Gives Up Ajinkya Rahane | ‘जो कधीच हार मानत नाही = अजिंक्य’

‘जो कधीच हार मानत नाही = अजिंक्य’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक

खेतून झेप घेणारा पक्षी म्हणून ‘फिनिक्स’ची ओळख आहे. आजूबाजूचे वातावरण नकारात्मक असतानाही आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून नव्या उमेदीने झेप घेणाऱ्या व्यक्तीला ‘फिनिक्स’ची उपमा दिली जाते. अशीच फिनिक्स भरारी सध्या क्रिकेटच्या मैदानावर घेतली आहे ती आपल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने. दीड वर्षापूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरल्याने त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. त्याला ‘बीसीसीआय’च्या केंद्रीय करारातूनही वगळण्यात आले. यामुळे रहाणेची कारकीर्द संपल्यात जमा झाल्याची चर्चा सुरू झाली; मात्र त्याने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये आपले नवे रूप सर्वांसमोर आणले.

रहाणेने नोव्हेंबर २०२१ मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध भारताचे कर्णधारपद सांभाळल्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघात त्याची निवड झाल्यानंतर अनेकांनी टीका केली. कारण, २०२१ मध्ये रहाणेला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. २०२१च्या सुरुवातीला संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार म्हणून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्याची कामगिरी वगळता रहाणे फ्लॉप ठरला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धही अपयशी ठरल्यानंतर  रहाणेला भारतीय संघातून डच्चू देण्यात आला.

रणजी स्पर्धेत बऱ्यापैकी खेळ केल्याने पुन्हा रहाणेची चर्चा सुरू झाली; परंतु मायदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी रहाणेच्या निवडीबाबत विचारही झाला नाही. एकीकडे चेतेश्वर पुजारा हळूहळू संघात जम बसवीत असताना रहाणे रणजीमध्ये खेळत राहिला. रहाणेचे पुनरागमन कठीण दिसू लागले. सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकरही संघात प्रवेश करण्यासाठी सज्ज होते. आयपीएल लिलावादरम्यान चेन्नई सुपरकिंग्जने रहाणेला संघात घेतले; मात्र त्याला संधी किती मिळणार, हाही प्रश्न होताच. त्यामुळे अवघ्या ५० लाख रुपयांमध्ये करार झाल्यानंतर रहाणेबाबत फारशी चर्चा झाली नाही; परंतु नेहमी शांत राहणाऱ्या रहाणेला केवळ अचूक वेळेची प्रतीक्षा होती आणि संधी मिळताच त्याने ‘टायमिंग’ साधले.

८ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर झालेला मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामना रहाणेने अक्षरश: गाजवला. रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर येत जी स्फोटक खेळी केली त्याने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याची ही खेळी काही ‘फ्ल्यूक’ नव्हती. यानंतर रहाणेने राजस्थान, आरसीबी आणि कोलकाता संघांविरुद्धही वादळी फटकेबाजी केली. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा फटकाविणारा रहाणे अव्वल फलंदाज ठरला.

हा तोच रहाणे आहे का, ज्याला भारतीय संघातून वगळले होते? असा प्रश्न पडणे सहाजिक होते. रहाणेने काय केले? तर त्याने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला. कठोर मेहनत घेतली. वेळप्रसंगी क्लब क्रिकेट खेळणाऱ्यांसोबत सराव केला. कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेमधील ‘मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!’ या ओळी रहाणेने खऱ्या आयुष्यात जगल्या. परिस्थिती कितीही बिकट असो; स्वत:वर विश्वास ठेवा. येणारी वेळ आपलीच आहे. रहाणेच्या जिद्दीला मनापासून सलाम! पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!’ या ओळी रहाणेने खऱ्या आयुष्यात जगल्या. परिस्थिती कितीही बिकट असो; स्वत:वर विश्वास ठेवा. येणारी वेळ आपलीच आहे. रहाणेच्या जिद्दीला मनापासून सलाम!

Web Title: "He Who Never Gives Up Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.