आयसीसी क्रिकेट विश्वचषक-2023 बरोबरच राहुल द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळही संपला आहे. 2021 ला झालेल्या T20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला होता. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला ही भूमिका सांभाळण्यासाठी राजी केले होते.
...तर पुन्हा IPL मध्ये दिसेल राहुल द्रविड -माध्यमांतील वृत्तांनुसार, आयपीएल फ्रँचायझी लखनौ सुपर जायंट्ससोबत (एलएसजी) राहुल द्रविडची चर्चा सुरू आहे. सर्व काही सुरळीत असल्यास, द्रविड आयपीएल 2024 पूर्वीच एलएसजीचा मेंटर बनू शकतो. मात्र, हे सर्व द्रविड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातील संभाव्य बैठकीनंतरच निश्चित होईल. द्रविड कार्यकाळ वाढवण्यासंदर्भात मागणी करेल, याची शक्यता फारच कमी आहे.
द्रविडची आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची इच्छा आहे. मात्र, हे भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि सततच्या प्रवासामुळे शक्य होणार नाही. आयपीएल संघात सामील झाल्यामुळे द्रविडला त्याच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. कारण ही स्पर्धा केळव दोन महिनेच चालते. लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझी राहुल द्रविडला आपल्या संघात सामील करण्यास उत्सुक आहे. खरे तर, गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्समध्ये गेल्याने एलएसजीमध्ये मेंटरचे पद रिक्त झाले आहे.
राहुल द्रविडला या जुन्या संघाकडूनही ऑफर -महत्वाचे म्हणजे, राजस्थान रॉयल्स (RR) देखील राहुल द्रविडला आपल्या सोबत जोडण्यास उत्सुक आहे. यापूर्वी राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू म्हणून आणि नंतर प्रशिक्षकाच्या भूमिकेतही दिसला आहे. याशिवाय, राहुल द्रविडने भारत-ए आणि एनसीए सोबतही काम केले आहे.