नवी दिल्ली : निदाहास चषकातील श्रीलंकाविरोधातील सामन्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी आपल्या ड्रेसिंग रुममध्ये तोडफोड केली. यामागे शाकीब अल हसन याचेच डोके असल्याचे मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांच्या चौकशीत आढळून आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शाकीबने रागाच्या भरात दरवाजा ढकलताच ड्रेसिंग रुममधील काचा फुटल्याची साक्ष स्थानिक कर्मचाऱ्याने दिली. यजमान संघातील खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर शाकीबने ड्रेसिंग रुमचा दरवाजा रागाने ढकलला. त्यात दरवाजा तुटून काचा फुटल्या. लंकेतील प्रसारमाध्यमांनी घडलेल्या प्रकाराचे इतिवृत्त प्रकाशित केले. त्यात शाकीबला जबाबदार धरले आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून पराभव केला. या पराभवाचे दु:ख अनावर झाल्याने चाहत्यांसोबत बांगलादेशचे काही खेळाडूही रडले.
त्याआधी झालेल्या सामन्यात बांगलादेशने यजमान श्रीलंकेला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये झालेली बाचाबाची चांगलीच लक्षात राहील. नो-बॉलचा निर्णय न दिल्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त करीत मैदान जवळपास सोडलेच होते. तसेच, त्यांच्या काही खेळाडूंची श्रीलंकेच्या खेळाडूंसोबत हुज्जतही झाली होती. या हमरातुमरीचे पडसाद सामन्यानंतर उमटले. त्यातच ड्रेसिंग रुमचा दरवाजा तोडण्याचा प्रकार घडला. बांगलादेशने सामन्यात विजय मिळवला, पण त्यांच्या वर्तनावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली. क्रीडा रसिकांनी सोशल मीडियावर बांगलादेश संघाला चांगलेच धारेवर धरले. मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी या प्रकरणात चौकशी करीत बांगलादेश संघाच्या मानधनातून २५ टक्के रक्कम कापून घेतली.