न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली. या भेटीमध्ये ट्रम्प आणि गावस्कर यांच्यामध्ये 'हार्ट टू हार्ट' संवाद झाल्याचे म्हटले जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. गावस्कर तिथे समालोचन करताना दिसतात. पण मग गावस्कर न्यूयॉर्कला ट्रम्प यांना भेटायला गेले तरी कधी, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय आणि कसोटी मालिका यांच्यामध्ये जे काही विश्रांतीचे दिवस होते. या दिवसांमध्ये गावस्कर हे न्यूयॉर्कला गेले आणि ट्रम्प यांची भेट घेतली.
गावस्कर ट्रम्प यांना का भेटले?
'हार्ट टू हार्ट फाउंडेशन' ही संस्था नवी मुंबई येथील श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलशी संलग्न आहे. या संस्थेमध्ये नवजात बालकांना हृदय विकार झाला असले तर त्याच्यावर मोफत शस्त्रक्रीया केली जाते. ही संस्था याबाबत जागरुकताही करते. या शस्त्रक्रीयांसाठी जास्त पैसे लागतात आणि ते देणग्यांच्या स्वरुपात मिळवले जातात. गावस्कर हे न्यूयॉर्क आणि अटलांटा येथे या संस्थेसाठी देणगी जमा करण्यासाठी गेले होते. यावेळी न्यूयॉर्क येथे बेडमिंस्टर गोल्फ कोर्स येथे गावस्कर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या कार्याबद्दल माहिती दिली. गावस्कर यांनी न्यूयॉर्क आणि अटलांटा येथे जाऊन 230 शस्त्रक्रीया होऊ शकतील, एवढी देणगी जमा केली आहे. कसोटी मालिकेनंतरही गावस्कर काही कार्यक्रमांच्या माध्यमातून देणगी जमा करणार आहेत.
विराट कोहलीवर भडकले सुनील गावस्कर
भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी समालोचन करताना गावस्कर यांनी कोहलीवर तोफ डागली.
गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."
अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.
बाऊन्सरला घाबरत नाही म्हणणारा कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाला
फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सर टाका, असं विधान करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली तोंडघशी पडला आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर यावेळी काही बाऊन्सर्सचा समर्थपणे सामना कोहलीला करता न आल्याचेच पाहायला मिळाले.
कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. कोहली आता आक्रमकपणे फलंदाजी करणार, असे वाटत असताना कोहली वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गॅब्रियलने एक उसळता चेंडू कोहलीच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने टाकला. कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या ब्रुक्सने पकडला. बाद होण्यापूर्वी कोहलीला काही बाऊन्सर्स टाकण्यात आले. यावेळी कोहलीला या बाऊन्सर्सचा सामना कोहलीला समर्थपणे करता आला नसल्याचेच पाहायला मिळाले.
Web Title: 'Heart to Heart' dialogue between Sunil Gavaskar and Donald Trump
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.