टी २० वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने या प्रकारातून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात बऱ्याच घडामोडी घडत चालल्या आहेत. राहुल द्रविडने प्रशिक्षक पद सोडले व गौतम गंभीरची वर्णी लागली. या २० दिवसांत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सारे काही आलबेल नाही असेच काहीसे संकेत मिळत आहेत. टी २० चा नवा कप्तान, संघ निवडताना निवड समितीच्या बैठकीत वादावादी झाल्याचे समोर येत आहे. ते ४ निर्णय...! हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाडला वगळले; गंभीरने केकेआरच्या खेळाडूंना झुकते माप दिले
भारतीय संघ निवडण्याची ही बैठक दोन दिवस कित्येक तास चालू होती. या बैठकीत सिलेक्टर्स, प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये मतभेद, मनभेद आणि वादावादी झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीतूनच अनेक खेळाडूंना फोन केले गेले आणि त्यांना दीर्घकालीन योजनेवर विचारणा करण्यात आली. यामध्ये सूर्याला कप्तान केले तर, हार्दिकला केले तर याबाबतही खेळाडूंना विचारणा करण्यात आली.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यावेळची टीम निवडीची बैठक इतर बैठकींपेक्षा वेगळी होती. या बैठकीत जोरदार वादविवाद आणि मतभेद पहायला मिळाले. खेळाडूंना फोन करून संघ व्यवस्थापनाच्या दीर्घकालीन योजना समजावून सांगितल्या जात होत्या. पांड्याने जेव्हा श्रीलंकेतील मालिकेत सहभागी होणार नाही असे सांगितले तेव्हा सिलेक्टर्सच्या मनात शंकेची जागा निर्माण झाली होती. खेळाडूंनी पांड्यापेक्षा सूर्यावर जास्त भरवसा दाखविला आणि सूर्याच्या नेतृत्वात खेळण्यास जास्त सोयीस्कर असल्याचे बीसीसीआयला सांगितल्याचे वृत्त आहे.
पांड्याने विश्वचषकावेळी चांगली कामगिरी केली यामुळे त्याला कप्तान न बनविणे हे अन्यायकारक ठरेल असे अनेकांचे मत होते. निवड समिती यासाठी फारशी उत्सुक नसतानाही पांड्याला उपकर्णधार म्हणून ठेवण्याचा रोहितचा निर्णय होता, असेही काही खेळाडूंनी सांगितले. या साऱ्या वादामुळे पांड्याऐवजी सूर्याला कर्णधार बनविण्यात आले. यासाठी सिलेक्टर आगरकर आणि प्रशिक्षक गंभीर यांनी आपल्याकडे नव्या नेतृत्वात पुढील दोन वर्षांसाठी संघ तयार करण्यासाठी फारसा वेळ नाहीय, यामुळे श्रीलंकेसोबतची मालिकाच यासाठी योग्य असल्याचा युक्तीवाद केला होता.
याचबरोबर सूर्याचे खेळाडूंना समजून घेणे, त्यांचे व्यवस्थापन करणे बीसीसीआयला भावले होते. इशान किशन गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या मध्यावर दौरा अर्धवट सोडणार होता. तेव्हा सूर्याने त्याला तिथेच राहण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला होता. सूर्याचे हे वागणे बीसीसीआयने हेरले होते. याचाही सूर्याला फायदा झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.