पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम विविध कारणांमुळे चर्चेत आहे. शेजारील देशातील प्रेक्षकांनी खराब सुविधांमुळे या स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. मात्र, अनेक नाट्यमय घडामोडींमुळे ही लीग चर्चेत असते. आता पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार अहमद आणि इंग्लंडच्या जेसन रॉय यांच्यात बाचाबाची झाली. लाईव्ह सामन्यात जोरदार राडा झाल्याने सामना काही काळ थांबवण्यात आला. मंगळवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानी क्रिकेटर इफ्तिखार अहमद आणि इंग्लिश खेळाडू जेसन रॉय यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले.
पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामातील २९ व्या सामन्यात मुल्तान सुल्तान आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यातील दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात क्वेटाचा फलंदाज जेसन रॉयला डेव्हिड विलीने LBW केले. यानंतर रॉय दुसऱ्या टोकाला असलेल्या त्याच्या संघातील सहकारी खेळाडूसोबत रिव्ह्यू घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी गेला. अशातच इफ्तिखार काही बोलला, जे ऐकून इंग्लिश क्रिकेटर संतापला आणि पाकिस्तानी क्रिकेटरकडे गेला आणि वाद घालू लागला.
वाद वाढत असल्याचे दिसताच मुल्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने हे प्रकरण शांत केले. या घटनेमुळे रॉयने रिव्ह्यू टाईमचा १५ सेकंदांचा वेळ गमावला आणि अवघ्या ३ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे या वादामुळे इंग्लिश खेळाडूला चांगलीच किंमत मोजावी लागली. रॉयसाठी पाकिस्तान सुपर लीगचा यंदाचा हंगाम एका वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. त्याने अलीकडेच आयपीएल २०२४ मधून आपले नाव मागे घेतले आहे. ३३ वर्षीय सलामीवीराने पीएसएलमधील ९ सामन्यांमध्ये १४३.१८ च्या स्ट्राईक रेटने केवळ २५२ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके आली.
मुल्तानचा मोठा विजय मुल्तानविरुद्धच्या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सला ७९ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. क्वेटाच्या संघाला निर्धारित २० षटकेही खेळता आली नाहीत आणि संघ १५.५ षटकांत ११० धावांवर सर्वबाद झाला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुल्तानच्या संघाने १८५ धावा कुटल्या ज्यात कर्णधार मोहम्मद रिझवानचे सर्वाधिक ६६ धावांचे योगदान होते.